विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांचे प्रतिपादन
मसुरे | झुंजार पेडणेकर :कोकणामध्ये फळप्रक्रिया उद्योगास प्रचंड वाव आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यानी स्मार्ट प्रकल्पात सहभागी होऊन आपले फळप्रक्रिया उद्योग उभारावेत असे आवाहन
विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे श्री अंकुश माने यांनी केले. स्मार्ट प्रकल्पाच्या विभागीय अंमलबजावणी कक्षाद्वारे कुडाळ येथे आयोजित विभागस्तरीय उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते. शेतकरी उत्पादक कंपन्यानी कृषी पायाभूत सुविधा योजनेचा लाभ घेऊन तारणा शिवाय रु 2 कोटी पर्यंतच्या कर्जावर 3% व्याज दर सवलतीचा देखील लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
विभागीय नोडल अधिकारी ठाणे येथील भिमाशंकर पाटील यांनी केले. स्मार्ट प्रकल्पाची ओळख त्यांनी करून दिली. तसेच कोकण विभागातील प्रकल्प अंमलबजावणीचा आढावा सादर केला. सदर प्रकल्प निवडीसाठी या पूर्वीची किमान २५० भागधारकांची अट शिथिल करून किमान १५० भागधारक अशी केली असून याचा लाभ घेऊन प्राथमिक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन केले. प्रादेशिक फळ सशोधन केंद्र, वेगुर्ला येथील शास्त्रज्ञ् डॉ. खापरे यांनी निर्यातक्षम काजू उत्पादन व प्रक्रिया तंत्रज्ञान तर डॉ. अजय मुंज यांनी काजू पिक संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे, प्रकल्प संचालक ( आत्मा ) सिंधुदुर्ग यांनी सेंद्रिय शेती चे महत्व व त्या साठीच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना याबाबत मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमात समूह संस्थाचे प्रतिनिधी सुनील पाळेकर, दीपक ठाकूर व श्रीमती रुपाली गुडेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. सदर प्रसंगी सहभागी १५ समूह संस्थाचे प्रतिनिधीचा शाल व आंबा कलम देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग विजय राऊत, विभागीय साख्यिकी अधीकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सदर प्रसंगी काजू मूल्य साखळी तील विविध घटकांचे गट तयार करून त्यांचे सादरीकरण करण्यात आले. श्री लक्ष्मण खुरखुटे यांनी आभार तर श्री करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.











