भाजप नेते निलेश राणे सुचवतील त्याच विकासकामांना प्राधान्य!

मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघाची संपुर्ण जबाबदारी भाजपाच्या माध्यमातून निलेश राणे यांच्याकडेच

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती 

अमित खोत | मालवण : भाजपने मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघाची संपुर्ण जबाबदारी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे त्यांच्याच माध्यमातून जी विकासकामे सुचवली जातील ती राज्य शासन व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने मंजूर होत आहेत. सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी निलेश राणे आग्रही व प्रयत्नशील आहेत असे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दरम्यान, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात भाजप पक्षाची सर्वाधिक ताकद आहे. त्यामुळे चारही जागी भाजपचेच उमेदवार हवेत. ही आमची मागणी आहे. असेही चिंदरकर यांनी स्पष्ट केले.

 

मालवण येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरचिटणीस महेश मांजरेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, बबलू राऊत, सुरेश चौकेकर, दीपक सुर्वे तसेच माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आदी उपस्थित होते.

 

धोंडी चिंदरकर म्हणाले, आमदार वैभव नाईक आणि त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या कामांची यादी फिरवीत त्यांना मंजुरी मिळाली असल्याचे सांगून जनतेची फसवणूक करत आहेत. प्रत्यक्षात या कामांना मंजुरी मिळालेली नाही जर मंजुरी असेल तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. कुडाळ मालवण मतदार संघातील विकासकामे सुचविण्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्र्यांनी निलेश राणे यांच्याकडे सोपविली आहे. त्यामुळे ते जी कामे सुचवतील त्यांनाच मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे आम्ही जनतेला कोणतीही विकास कामाची खोटी माहिती देणार नाही. जी कामे होणार आहेत त्याचीच माहीत तळागळातील ग्रामस्थांना देण्याच्या सूचना केल्या आहेत. मतदार संघातील प्रत्येक ग्रामपंचायतीला विकास निधी दिला जाणार असून कोणावरही अन्याय केला जाणार नाही.

 

सध्या विनायक राऊत प्रत्यक्षात निवडून आले तेव्हा त्यांची भाजप बरोबर युती होती. आता ते विरोधात आहेत. त्यामुळे आता या मतदार संघावर मेरिटनुसार भाजपचाच दावा असेल. मात्र पक्ष युती म्हणून जो निर्णय घेईल त्यानुसार भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते त्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम करतील. यावेळच्या निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव अटळ आहे. आमच्या समोर आता एकच लक्ष आहे पुन्हा केंद्रात मोदी यांचीच सत्ता. त्यांचे हात बळकट करायचे आहेत. भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला विजयी करणार आहोत. विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र दिसेल.

 

निलेश राणे हेच एकमेव उमेदवार – बाबा परब

 

राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी युतीचा विजय निश्चित आहे. मालवण कुडाळ मतदार संघात युतीच्या माध्यमातून भाजप कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे हेच एकमेव उमेदवार आहेत. तीनही पक्षातील सर्वाना सॊबत घेऊन निलेश राणे मतदारसंघात कार्यरत आहेत. त्यामुळे युतीकडून एकमेव उमेदवार म्हणून सर्वजण निलेश राणे यांचेच नाव घेत आहेत. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने निलेश राणे यांचा विजय कार्यकर्ते व जनतेने निश्चित केला आहे. असा ठाम विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी व्यक्त केला.