भगिरथ प्रतिष्ठान रोटरी क्लब व ग्रामपंचायतचा संयुक्त उपक्रम
आंबोली । प्रतिनिधी. : चौकुळ येथील दुर्गम भागांमधील धनगरवाडी चूरणीची मूस या परिसरामध्ये चौकुळ ग्रामपंचायत भगीरथ प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आले याच्या उद्घाटन प्रसंगी संबंधित मान्यवरांनी तेथील ग्रामस्थांना संबोधित केले.
यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर भाई बोरसादवाला, रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष सुहास सातोस्कर, सरपंच सुरेश शेटये, उपसंरपंच गुलाबराव गावडे, पांडू गावडे, डॉ. विनया बाड, भरत गावडे, प्रदीप शेवडे, रमेश भाट आदी उपस्थित होते.
यावेळी प्रत्यक्ष बायोगॅसची पाहणी करण्यात आली व बायोगॅस कार्यान्वित झाल्याची खात्री करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारचे अनेक प्रकल्प यापुढेही एकमेकांच्या सहाय्याने अनेक गावांमध्ये करायचे आहेत असे सांगितले. तर नासीर भाई यांनी इतक्या दुर्गम भागात लोक राहतात हेच मोठे आश्चर्य असून अशा प्रकारे लोकांना सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत व रोटरी क्लब यांचे आभार मानले व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी शाळेला संगणक संच, प्रत्येक घराला म्हणजेच २२ घरांना एक कुकर व बायोगॅससाठ २ लाख रुपये मंजूर केले. रोटरीचे सचिव प्रवीण परब यांनी उपस्थितांचे आभार मानले.










