सावंतवाडी । प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, आणि जिल्हा क्रीडाधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेत अकादमीतील २४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, त्यापैकी १६ जणांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेमध्ये सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला आणि मालवण या तालुक्यांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये साक्षी रामदुरकर, गार्गी सावंत, भूमी कामत, सई परुळेकर, माहिरा खुल्ली, आस्था लोंढे, चिदानंद रेडकर, पार्थ गावकर, अथर्व वेंगुर्लेकर, वसंत गवस, प्रबोध जाधव, सोनल मराठे, अर्श पोटफोडे, आणि प्रज्योत पुराणिक यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल बोलताना मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचावेत, हा आमचा प्रयत्न आहे.” त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गेल्या दहा वर्षांत मुक्ताई ॲकेडमीच्या १८ विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर, तर तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर निवड मिळवली आहे. कोकणामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारी ही एकमेव अकादमी आहे.
जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रशिक्षकांकडून विशेष प्रशिक्षण दिले जाईल, असेही पेडणेकर यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांच्या यशामागे प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि बाळकृष्ण पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या चमकदार कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.










