फोंडा घाटात कंटेनर उलटला.वाहतूक खंडित

पुन्हा रात्रीच्या वेळी लगतच्या वळणावर विद्युत केबलची बंडले कोसळल्याने कंटेनर उलटला

हा अपघात बाजारपेठेमध्ये घडला असता तर मोठा अनर्थ घडला असता यावर तातडीने वाहतूक पोलिसांकडून कार्यवाही होणे गरजेचे आहे

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी :मध्यप्रदेश वरून गोव्याच्या दिशेने केबल ची वाहतूक करणारा कंटेनर MH ४६ BF 3803 चालक ओमप्रकाश जगमोहन बर्मा वय ४५ राहणार उत्तर प्रदेश प्रतापगढ हा गोव्याच्या दिशेने विद्युत केबल बंडल ची वाहतूक करत असता ,फोंडाघाट मधील अवघड वळणावर गुरुवार सकाळी १०:३० च्या दरम्याने रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. त्यामुळे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुदैवाने कंटेनर चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. सदर घटना समजताच फोंडाघाट चेक पोस्ट वर असणारे पोलीस कॉन्स्टेबल मारुती बारड यांनी घटनास्थळी जाऊन, वाहतूक सुरळीत केली. यावेळी हवालदार राजेश ठाकूर हवालदार नितीन चोडणकर पोलीस कॉन्स्टेबल महादेव साबळे, हवालदार उत्तम वंजारे उपस्थित होते.

 

 

जेसीबी द्वारे बंडलस् पुन्हा सरळ केलेल्या कंटेनर मध्ये भरून गोव्याच्या दिशेने जात असताना, लगतच्याच वळणावर पुन्हा ओव्हरलोड मुळे सदर कंटेनर पलटी झाला. आणि केबलची बंडले रस्त्यावर इतरत्र पडली .हा प्रकार रात्री आठच्या दरम्यान पुन्हा झाला. त्यामुळे पुन्हा एकदा आरटीओ तसेच पोलीस यांना धाव घेऊन खंडित वाहतूक सुरळीत करणे भाग पडले. यादरम्यान कंटेनरच्या मालकाला फोनवरून इतर गाडी पाठवणे आणि क्रेन द्वारे विद्युत बंडले भरून गाड्या परत पाठवण्याची प्रक्रिया सकाळी सुरू करण्यात आली आहे.

 

 

ओवरलोड गाड्या तीव्र वळणावर पलटी होत असल्याने,यावर वाहतूक नियंत्रण पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा पलटी होण्याचा प्रकार लगतच्या बाजारपेठेमध्ये घडला असता,तर मोठा अनर्थ आणि अपघात होण्याची शक्यता दाट होती. याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र प्राप्त परिस्थितीमध्ये धाव घेणाऱ्या वाहतूक नियंत्रक विभाग आणि स्थानिक पोलीस तसेच ग्रामपंचायत सदस्य पवन भालेकर यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.