लोटे पोलीस चौकीत धडक : कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील लोटे तील दीपक नोव्हा केम कंपनीत . ८ रोजी झालेल्या अपघातास कंपनी व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप करत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी लोटे पोलीस दूर क्षेत्रात अधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये दीपक नोव्हा केम ही कंपनी असून .८ रोजी दुपारी ३.३० वाजता कंपनीमध्ये अपघात होऊन प्रतीक कांबळे वय -२२, रा.खेडी ता.चिपळूण व प्रशांत कदम रा. वालोटी ता. चिपळूण हे दोन तरुण गंभीरित्या भाजले परंतु या अपघाताची कोणतीही माहिती कंपनी व्यवस्थापनाने रविवारी पर्यंत पोलीस प्रशासनाला दिलेली नाही. यावर दोन्हीही भाजलेल्या कामगारांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना सदर प्रकरण परस्पर मिटवण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापन करत आहे. औद्योगिक सुरक्षा सप्ताह सुरू असताना घडलेल्या या अपघातास कामगारांच्या सुरक्षितते कडे झालेले कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष हे एकमेव कारण असल्याचे चर्चिले जात आहे.
या दुर्घटनेनंतर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. जिल्हा सरचिटणीस विनोद चाळके, खेडीचे उपसरपंच विनोद भुरण, सचिन चाळके, माजी सरपंच सुनील मिस्त्री, माजी सरपंच रवींद्र फाळके, विनय दाते, राजू शिंदे, सुनील देशपांडे यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रविवारी लोटे पोलीस दूर क्षेत्रात अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी दीपक नोव्हा केम कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त करत संबंधित कामगारांना न्याय मिळावा व घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या कडे केली आहे. परंतु या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
दरम्यान तिसऱ्या दिवशी देखील स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. कंपनी व्यवस्थापनाचा गलथान कारभार कंपनीच्या बाजूने बोलण्यासाठी अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांवर वेळोवेळी दबाव टाकला जात आहे. यासंदर्भात लोटे पोलीस ठाण्यात ल कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीने मागणी केली असता पोलीस प्रशासन हे या प्रकरणी वेळकाढूपणा करीत आहे. तरी या प्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास आम्ही सनदशीर मार्गांचा अवलंब करू अशी प्रतिक्रिया भाजपाचे सरचिटणीस व खेडी उपसरपंच विनोद भुरण यांनी दिली









