भारतातील पहिल्या “कवितांचे गाव” दालनाचे उभादांडा येथे शानदार उद्घाटन व लोकार्पण 

कवी मंगेश पाडगावकर यांच्या जन्मगावी दालनाचे उद्घाटन करण्याची संधी हा आनंद : मंत्री दीपक केसरकर

वेंगुर्ले l दाजी नाईक :सांगा कस जगायच.. कणतकणत की गाण म्हणत…जगण्याला दिशा देणाऱ्या अशा असंख्य कविता ज्यांनी लिहिल्या ते थोर कवी मंगेश पाडगावकर यांचा आज जन्मदिन. या दिनाचे औचित्य साधून त्यांच्याच उभादांडा या जन्मगावी भारतातील पहिल्या “कवितांचे गाव” या दालनाचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्याची संधी मला मराठी भाषा मंत्री असताना मिळत आहे, याचा मला आनंद आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी उभादांडा येथे बोलताना केले.

महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने साकारलेल्या “कवितेच्या गावा”चे उदघाटन व लोकार्पण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आज संपन्न झाले.

यावेळी व्यासपीठार उभादांडा सरपंच निलेश चमणकर, पाडगावकर यांच्या नातसून डॉ. अनुपमा उजगरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनिल डूबळे, वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मराठी मंडळाचे संचालक डॉ. शशिकांत देवरे, राज्य मराठी मंडळाचे सदस्य रेखा दिघे, मुख्याधिकारी पारितोष कंकाळ, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, जागामालक श्रीमती वेंगुर्लेकर, आंदुर्केकर, वसंत तांडेल, बाबा मोंडकर, नियोजन समिती अध्यक्ष श्री. बुधावले, आर्किटे्ट अमित कामत, डायना डिसोजा, ठेकेदार दिलीप पाटील, बाळा दळवी, संतोष परब यांच्या सह कार्यक्रमाला वाचक प्रेमी, कविताप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*उभादांडा येथे अशी 21 दालन उभी राहणार..*

मंत्री केसरकर यांच्या हस्ते उभादांडा येथे कवितांचे गाव मधील आज पहिल्या दालनाचे प्राथनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.अशी 21 दालन या गावात ग्रामस्थांच्या घरी उभी राहणार आहेत. मंत्री केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, आपली कोकणी माणस कर्ज काढत नाही आणि आत्महत्या करत नाही. पूर्ण क्षमतेने काम करतात म्हणूनच या भागात अनेक रत्न झाली त्या पैकी एक रत्न म्हणजे पाडगावकर. लवकरच नवाबाग फिशिंग व्हीलेज होणार असून वेंगुर्ले बंदरावर सुंदर अशी जेठी उभारण्याचाही प्रस्ताव आहे. जेणेकरून या भागात पर्यटकांची संख्या वाढेल आणि लोकांना रोजगार मिळेल असे ही त्यांनी सांगितले.

सरपंच निलेश चमणकर यांनी बोलताना मंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतून हे कवितांचे गाव झालं आमच्या उभारंडा गावाला जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण करून देईल असे सांगितले. तर पाडगावकर यांच्या नातसून डॉ. अनुपमा उजगरे यांनी मनोगत व्यक्त करताना पाडगावकर यांचे जन्म गावी होत असलेले दालन पाहून खूप आनंद झाला असे सांगितले.

प्रथम शाळकरी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत गायन केले. त्यानंतर दीप प्रज्वलन व दालनाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आपटे यांनी केले.