मुरादपुर बावनदी पुलाजवळ झालेल्या अपघातातील जखमी दुचाकी चालकाचा उपचारांदरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू

रत्नागिरी | प्रतिनिधी : सारखपा-देवरुख रस्त्यावरील मुरादपुर बावनदी पुलाजवळ दुचाकी आणि महिंद्रा जितो गाडीत समोरासमोर धडक होउन अपघात झाला. अपघाताची ही घटना रविवार 10 मार्च रोजी रात्री 10.45 वा.घडली असून अपघातातील जखमी दुचाकी चालकाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात सोमवारी सकाळी 6 वा. मृत्यू झाला.

सिध्देश गावडे (25,रा.चाफवली संगमेश्वर,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुण दुचाकी चालकाचे नाव आहे. याबाबत महिंद्रा चालक आकाश राजाराम सावंत (24,रा.साखरपा भंडारवाडी संगमेश्वर) यांनी देवरुख पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री आकाश सावंत आपल्या ताब्यातील महिंद्रा जितो गाडी (एमएच-08-एपी-3019) मधून साखरपा येथून स्फूर्ती कंपनीचे दूध घेउन देवरुखच्या दिशेने जात होता. त्याच सुमारास सिध्देश गावडे हा आपल्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-08-बीबी-8192) वरुन समोरुन येत होता. रात्री 10.45 वा. सुमारास ही दोन्ही वाहने बावनदी पुलाजवळ आली असता सिध्देशचा आपल्या दुचाकीवरील ताबा सूटला आणि त्याने समोरुन येणार्‍या महिंद्रा जितो गाडीच्या ड्रायव्हर साईडला ठोकद देत अपघात केला.

या अपघातात सिध्देश गंभिर जखमी झाल्याने त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना सिध्देशचा सोमवारी सकाळी 6 वा.उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास देवरुख पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार संजय मारळकर करत आहेत.