सावंतवाडी – वेंगुर्ला- दोडामार्ग नगरपरिषद विकास कामाना २० कोटी मंजूर

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग नगर पालिका अंतर्गत रस्ते, डांबरीकरण, उद्याने आदी विविध नागरी सेवा सुविधांसाठी शासनाने तब्बल २० कोटींचा निधी मंजूर केला असून सावंतवाडी नगरपरिषदेसाठी ९ कोटी ७५ लक्ष, वेंगुर्ला नगरपरिषदेसाठी ७ कोटी ७५ लक्ष व दोडामार्गसाठी २ कोटी ३० लक्ष निधी वितरीत होत आहे. शालेय शिक्षणमंत्री मा. ना. दिपकभाई केसरकर यानी जनतेच्या मागणीची दखल घेत मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांचे मार्फत हा निधी मंजूर करुन घेतला आहे.

शासनाने यावर्षी नगर विकास विभागाला ५०० कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला असून त्याद्वारे नगरपरिषदांना विकास निधी देण्यात येत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या नगरपरिषदांना २० कोटी निधी देण्याचा शासन आदेश १३ मार्चला जारी करण्यात आला आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेअंतर्गत सुमारे दीड कोटीचे मटण मार्केट, एक कोटीचे म्युझियम, बहुद्देशिय इमारती, ओपन जिम, जिमखाना येथे सिंथेटिक लॉन, टेनिस कोर्ट, उपरल स्मशानभुमिचे नुतनीकरण, आत्मेश्वर तळींचा विकास, भटवाडी पुलांचे मजबुतीकरण बोअरवेल, उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी आणि विविध विकास कामांचा समावेश आहे.

वेंगुर्ल्यासाठी सुमारे ८ कोटी :
वेंगुर्ला नगरपरिषदअंतर्गत रस्ते सुविधा आदी कामांसाठी सुमारे ८ कोटींची तरतूद असून वेंगुर्ला मांडवी भागात पर्यटनदृष्टया फ्लोटिंग रिसॉर्ट अंतर्गत कामासाठी ५ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. शहरातील पायवाटांचे सिमेंटीकरण रस्त्याचे डांबरीकरण स्ट्रीट लाईट, संरक्षक कठडयांचे बांधकाम आदी कामे अंतर्भुत आहेत.

दोडामार्ग जलशुद्धीकरण केंद्र

दोडामार्ग नगरपरिषदेसाठी २ कोटी ३० लाखाची तरतूद असून कसई दोडामार्ग हद्दीतील नळ योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी १ कोटी ७० लाखाची तरतूद आहे. तर साठवण टाकीसाठी ६० लाख निधी देण्यात आला आहे.

तिनही शहरातील महत्त्वाची मंजूर विकास कामे पुढील प्रमाणे आहेत. यात सावंतवाडी नगरपरिषदेच्या मालकीच्या आ.क्र. ६६ जुना फिश व मटण मार्केटसाठी आरक्षित जागेत मटण मार्केट चे बांधकाम करणे (भाग-२) रु. १४७ लक्ष, सावंतवाडी नगरपरिषदेच्या मालकीच्या निर्माण भवन बाजूच्या जागेत म्युझियमचे बांधकाम करणे पहिल्या टप्प्यामध्ये तळमजल्यावर पार्किंग साठी सुविधा करणे ९६ लक्ष, दर्पण सोसायटीमागील नाल्याचा उर्वरीत भाग स्लॅब घालून बंदिस्त करणे रु.४०.०० लक्ष, सबनीसवाडा सुवर्ण कॉलनी उद्यानमध्ये बहुद्देशिय बांधकाम व विविध विकास कामे करणे रु. ३० लक्ष, सुवर्ण कॉलनी बिरोडकर टेंब येथील न.प. च्या मालकीच्या खुल्या जागेत बहुद्देशिय इमारत बांधकाम करणे रक्कम रु. ३० लक्ष, आ.क्र. ५६ खेळाचे मैदान या आरक्षणाचा विकास करणे, नरेंद्र डोंगर होळीचा खुंट येथे ओपन जिम व इतर सुविधा निर्माण करणे रु.५० लक्ष, सावंतवाडी नगरपरिषदेच्या मालकीच्या सालईवाडा टेलिफोन भवन समोरील जागेत बहुद्देशिय इमारत बांधणे ता. सावंतवाडी रु. १५०लक्ष, जिमखाना मैदान येथे सिंथेटिक लॉन टेनिस कोर्ट तयार करणे रक्कम रु.६० लक्ष, उपरल स्मशानभूमी येथे विविध विकास कामे करणे रु. ६०.०० लक्ष, स्पोर्ट कॉम्लेक्सचे दुसऱ्या मजल्यावर बहुद्देशिय हॉल साठी बांधकाम करणे रु. ५० लक्ष, बापूसाहेब पुतळा ते राणी पार्वतीदेवी हायस्कूल ते शिवराम राजे पुतळ्यापर्यंत मोती तलावालगतच्या फुटपाथची दर्जावाढ करणे ६०लक्ष, आत्मेश्वर तळी परिसर अंतर्ग विविध विकास कामे करणे रु. ५० लक्ष,
खासकीलवाडा खिश्चन सिमेंट्री दर्जावाढ करणे रु.२० लक्ष, सबनिसवाडा ओम गणेश बिल्डींग शेजारील गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसवून इतर अनुषंगिक कामे करणे रु.१० लक्ष, दत्त नगर येथील खुल्या जागेत गार्डन विकसीत करणे रु.१५ लक्ष तसेच रस्ते इतर सुविधांसाठी मिळून एकूण ९.७५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

तर वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील मांडवी भागात पर्यटनदृष्टया फ्लोटिंग रिसॉर्ट अंतर्गत विविध विकास कामे करणे रु.५०० लक्ष तसेच रस्ते इतर रस्ते, गटारे व इतर सुविधांसाठी मिळून एकूण ७.९५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तर कसई – दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील मुख्य नळ योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र उभारणे रु.१७०लक्ष, कसई – दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील नळ योजनेअंतर्गत नवीन साठवण टाकीचे (GSR) बांधकाम करणे ता. दोडामार्ग रक्कम रु.६० लक्ष तसेच रस्ते इतर रस्ते, गटारे व इतर सुविधांसाठी मिळून एकूण २.३० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.