प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील आर्यन कृष्णात भोईटे (व.व१७) या युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याबाबतची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
आर्यन भोईटे याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. दहावीच्या परीक्षेत तो चांगल्या टक्केवारी ने पास झाला होता. आर्यन हा आपल्या आई-वडिलांसोबत तुरंबे येथील भोईटे माळ या शेतातील घरात राहत होते. आज सकाळी त्याचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी घरी आर्यन त्याचा मोठा भाऊ आणि बहीण उपस्थित होते. आर्यन घराच्या मागील बाजूस असलेल्या काजूच्या झाडाखाली बसलेला त्याच्या भावंडांना दिसला होता. नेहमीप्रमाणेच तो त्या झाडाखाली वेळ घालवत असेल असे वाटले.
दुपारनंतर आई-वडील परत आल्यावर आर्यन घरात कुठेही दिसला नाही. सगळीकडे शोधा-शोध केली असता शेतात झाडाखाली त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने राधानगरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.आर्यांनअत्यंत शांत आणि मनमिळवू स्वभावाचा असल्याने त्याचा गावात मित्रपरिवार ही मोठा होता. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अजुन समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे.पुढील तपास राधानगरी पोलिस करत आहेत.












