मांगवलीतील मधुकर भुर्के विद्यालयाच्या संरक्षक भिंतीचे लोकार्पण
वैभववाडी l प्रतिनिधी : आपल्या उत्पन्नाचा काही भाग आणि आपल्याकडे असलेले पद व अधिकाराचा उपयोग प्रत्येकाने सामाजिक कामासाठी केला पाहिजे. त्यातून राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागत असतो. माझ्या पदाचा उपयोग गावातील विद्यालयासाठी करु शकलो याचे मला समाधान आहे, असे मत पुणे येथील कॅस्केड इंडिया मटेरियल हॅंडलिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर विष्णू भागवत यांनी व्यक्त केले.
कोंकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई, संचलित मांगवलीतील मधुकर सीताराम भुर्के विद्यालयाच्या सभोवताली उभारलेल्या संरक्षक भिंतीचे लोकार्पण करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी जमविलेली देणगी आणि विष्णू भागवत ‘कॅस्केड इंडिया मटेरियल हॅंडलिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ‘सीएसआर’मधून मिळवून दिलेल्या ५ लाख रुपये देणगीतून विद्यालयाच्या संरक्षक भिंतीचा संकल्प पुर्णत्वास गेला.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्रीधर राणे, सरपंच शिवाजी नाटेकर, माजी सभापती सुवर्णा संसारे, माजी सरपंच राजेंद्र राणे, संस्थेचे उपाध्यक्ष सतीश जागुष्टे, सहसचिव विठ्ठल राणे, सखाराम राणे, दिगंबर भागवत, सुमाताई भागवत, दिलीप कोलते, मुख्याध्यापक एस. डी. पाटील आदी उपस्थित होते.
संस्थेच्या आगामी योजना व संकल्पांबाबत माहीती देतानाच संरक्षक भिंतीसाठी विष्णू भागवत तसेच माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रम संस्थाध्यक्ष श्रीधर राणे यांनी कौतुक केले. यावेळी विष्णू भागवत आणि संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी सहकार्य केलेल्या व्यक्तींचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक एस डी पाटील यांनी तर सूत्रसंचालन शरद कांबळे यांनी केले. जे. आर. भोसले यांनी आभार मानले.









