सुख मिळवायचे असेल तर प्रपंचाला अधात्माची जोड दिली पाहिजे-रविंद्र नागरेकर

 

भू येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

राजापूर (वार्ताहर): मनुष्य जन्मात सुख समाधान मिळवायचे असेल तर आपल्या रोजच्या प्रपंचाला अधात्माची जोड दिली पाहिजे. संसारातून थोडासा वेळ काढून हरि भजन, नामस्मरण केले पाहिजे असे प्रतिपादन राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष रविंद्र नागरेकर यांनी तालुक्यातील भू येथे केले.

वारकरी सांप्रदाय भू पंचक्रोशीच्या वतीने भू येथील ग्रामदेवतेच्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यात्मिक मार्गदर्शन करताना श्री. नागरेकर बोलत होते.

श्री. नागरेकर म्हणाले की, आपण सर्व काबाड कष्ट करणारी माणसे आहोत. संसार करत असताना अनेक प्रकारची दु:ख, वेदना आपल्याला येतात. ही दुखावर मात करण्याचा एकमेव उपाय हा भगवंताचे नाम घेणे आहे. अशा प्रकारच्या हरिनाम सप्ताह, हरिपाठ, अध्यात्मिक किर्तन, प्रवचनातून माणसाला सुख, आनंद मिळविता येतो. त्यामुळे आपल्या भावी पिढीला आपल्या संस्कृतीची, रूढी परंपराची ओळख व्हावी यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले पाहिजेत. भू पंचक्रोशीने आयोजित केलेला हा कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी धनाजी तांबे, श्री. खाडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश गुरव उपस्थीत होते. या कार्यक्रमाला महिला भाविकांची उपस्थीती लक्षणीय होती.यावेळी श्री. नागरेकर यांचा भू पंचक्रोशी वारकरी सांप्रदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला.