राजापूर (वार्ताहर): शिमगोत्सवाबरोबरच येणारा रमजान सण लक्षात घेता राजापूर नगर परिषदेने राजापूर शहरात ११ एप्रिल पर्यंत नियमीतपणे ३० मिनिटे पाणीपुरवठा करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांसह माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पाणी टंचाईमुळे राजापूर नगर परिषदेने २० मार्च पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र होळीचा सण असल्याने असल्याने २६ मार्च पर्यंत मुदतवाढ दिली. मात्र होळीच्या सणाबरोबरच मुस्लिम् बांधवांचा रमजान हा उपवासाचा महिना सुरू असल्याने एक दिवसाआड पाणी पुरवठयाचा निर्णय ११ एप्रिल पर्यंत स्थगीत करून नियमीतपणे पाणीपुरवठा करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राजापूर नगर परिषदेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव यांची भेट घेवून अॅड. जमीर खलिफे व माजी नगरसेवक हनिफ युसुफ काझी, विनय गुरव, शुभांगी सोलगांवकर, गोविंद चव्हाण यांनी हे निवेदन दिले आहे.











