मुंबई मनपा आयुक्त डॉ. भूषण गगराणी ; सिंधुदुर्ग ते महापालिका व्हाया मंत्रालय

संतोष वायंगणकर

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या आयुक्तपदांवर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सौरभ राव, नवी मुंबईचे आयुक्त म्हणून कैलास शिंदे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून भूषण गगराणी यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी हे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. यामुळे भूषण गगराणी यांचे सिंधुदुर्गशी एक वेगळच नातं आहे.
कोल्हापूरचे असलेले भूषण गगराणी यांनी मराठी भाषेतून आयएएस केले आहे. मराठी भाषेतूनही आयएएस करता येते हे सुरेश जोशी, भूषण गगराणी यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिले. १९९८-९९ साली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदावर असतानाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विद्यमान केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असलेल्या भूषण गगराणी यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती मिळाली आणि मग भूषण गगराणी यांचा पुढचा सारा प्रशासकीय सेवेतील प्रवास सुरू झाला. गेल्या वीस-पंचवीस वर्षात भूषण गगराणी यांनी प्रशासनातील विविध विभागांमध्ये कर्तव्यदक्ष व कार्यक्षमतेने काम केले. मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान हा गगराणी यांचा प्रवास १९९९ मध्ये सुरू झाला तो मधल्या अनेक वर्षात तसाच सुरू राहिला. अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय सेवेतील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ.भूषण गगराणी यांची नियुक्ती झाल्याने डॉ.गगराणी यांच्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या कार्यकाळातील आठवणी आज आयुक्त नियुक्तीने उजळल्या गेल्या आहेत.