तळवली ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा उद्यापासून शिमगोत्सव

 

गुहागर l प्रतिनिधी :      तालुक्यातील तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला शनिवार दि.24 पासून सुरुवात होत आहे.

येथील श्री सुकाई देवी ग्रामदेवता ही जागृत व नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असून विविध ठिकाणाहून भाविक तिच्या दर्शनासाठी येत असतात. या ग्रामदेवतेचे खेळे दुसऱ्या होळीपासून गावभोवणीसाठी बाहेर पडतात. तसेच शेवटच्या होळीच्या दिवशी देवीची पालखी मंदिरातून मोठ्या उत्साहात भाविक नाचवत सहाणेवरती आणतात.यावेळी आंब्याचे झाड म्हणजेच माडवळ तोडून ते देखील देवीच्या पालखीसोबत नाचवत आणण्याची प्रथा या ठिकाणी आहे. यासाठी नोकरीनिमित्त देशी परदेशी असलेले चाकरमानी आवर्जून उपस्थित राहतात.

या शिमगोत्सव कालावधीत देवीची पालखी वाडी वस्ती वरती फिरणार आहे त्याचप्रमाणे या काळात सहाण भरणे देवीचा गोंधळ व पेवेगावची प्रसिद्ध ग्रामदेवता झोलाई देवी या दोन बहिणींच्या पालखी भेटीचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. यावेळी रविवार दि.24 रोजी पालखी मिरवणूक, मंगळवार दि.26 रोजी सहाण भरणे,बुधवार दि.27 रोजी मानकरी घरे घेणे,गुरुवार दि.28 रोजी शिगवणवाडी,शुक्रवार दि.29 रोजी देऊळवाडी,शनिवार दि.30 रोजी भेळेवाडी,रविवार दि. 31 रोजी सावंतवाडी, सोमवार दि.1 एप्रिल रोजी आगरवाडी नं.1,मंगळवार दि.2 रोजी आगरवाडी पूर्व,बुधवार दि.3 रोजी भडकंबावाडी,गुरुवार दि.4 रोजी ब्राम्हणवाडी व श्री सुकाई देवी आणि श्री झोलाई देवीचा पालखी भेट सोहळा,शुक्रवार दि.5 रोजी डावलवाडी, शनिवार दि.6 रोजी संपूर्ण चिंचवाडी, रविवार दि.7 रोजी देवीचा गोंधळ, सोमवार दि.8 रोजी क्षेत्रफाळ,मंगळवार दि.9 रोजी गुढीपाडवा देवी मंदिरात जाऊन या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.या शिमगोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामदेवता कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण व सचिव प्रदीप चव्हाण यांनी गावाच्या वतीने केले आहे.