दिवसेंदिवस वाढत चाललेले पर्यटन डोळस व्हावे आणि तरुणांनी पर्यटनाचे आयाम पर्यावरणस्नेही करण्यास हातभार लावावा अशी अपेक्षा कोकणातील पर्यावरण चळवळींचे कार्यकर्ते प्रशांत परांजपे यांनी व्यक्त केली. ते डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातील वनशास्त्र महाविद्यालयात सुरू होणार्या तीन-दिवसीय निसर्गपर्यटन/कृषिपर्यटन प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते त्यांनी त्यांच्या आम्रपली ग्रामसहवास या पर्यावरणस्नेही पर्यटन प्रकल्पाची ओळख करून देत डोळस पर्यटनाची अनेक सूत्रे मांडली*.
भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सहकार्यातून अनुसूचीत जातींच्या विद्यार्थ्यांसाठी खास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 23 ते 25 मार्च दरम्यान चालणार असून यात निसर्ग पर्यटन आणि कृषि पर्यटनात महत्वपूर्ण कार्य करणारे निसर्ग मार्गदर्शक तयार व्हावेत यासाठी विविध कौशल्ये अवगत करून त्यांचा सराव करून घेतला जाणार आहे. वनशास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षित विद्यार्थी प्रशिक्षकांची महत्वाची भूमिका पार पडणार आहेत. या प्रशिक्षकांचे आंतर्राष्ट्रीय निसर्ग मार्गदर्शकांकरवी प्रशिक्षण झाले असून त्यांच्या गाठीशी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात दिलेल्या प्रशिक्षणांचा अनुभव आहे. त्याशिवाय अनेक वर्षे यशस्वीरीत्या चालवणारे श्री प्रशांत परांजपे, कोकण प्राइड रिसॉर्टचे श्री संजय नाईक आणि निसर्गपर्यटन प्रकल्पाचे प्रमुख प्रा. विनायक पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ‘निसर्ग मार्गदर्शकांसाठी हस्तपुस्तिका’ हे पायल मेहता व हर्षा के. यांचे लिखित आणि विनायक पाटील अनुवादीत पुस्तक देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे 40 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. उद्घाटन प्रसंगी वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सतीश नारखेडे अध्यक्षस्थानी होते आणि डॉ. अजय राणे, डॉ. विनोद म्हैसके उपस्थित होते. प्रशिक्षणाचे आयोजन आणि क्षेत्रीय प्रशिक्षक म्हणून मोसम कुंभरे, मानसी डिचवलकर, प्रणाली गोफणे, मधुरा थोरात, गार्गी आढाव, हिमांशु बैंगणे काम पाहणार आहेत.









