काकीच्या डोक्यात पुतण्याने फोडली काचेची बाटली

कणकवली : तालुक्यातील बिजलीनगर येथे भगवती मंगल कार्यालयानजीकच्या एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौ. भावना भास्कर परब (६०) यांना मारहाण केल्याप्रकरणी त्याच अपार्टमेंटमध्ये राहणारा त्यांचा पुतण्या रुपेश मनोहर परब (४९) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अपार्टमेंटच्या खाली शनिवारी सकाळी ६.४५ वा. सुमारास घडली. या हल्ल्यात भावना या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे.

 

भावना यांच्या फिर्यादीनुसार, रुपेश याने यापूर्वी भावना यांच्या सुनेला मारहाण केली होती. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती, याचा राग रुपेश याच्यो मनात होता, शनिवारी सकाळी भावना या अपार्टमेंटच्या खाली असलेल्या झाडांना पाणी घालत होत्या. त्यावेळी हातात लोखंडी सळी व काचेची बाटली घेऊन तेथे आलेल्या रुपेश याने भावना यांच्या कपाळावर बाटली मारली. त्यानंतर त्याने लोखंडी सळीने भावना यांना मारहाण केली. रुपेश याने केलेल्या मारहाणीत भावना खाली कोसळल्या. घडला प्रकार समजल्यानंतर भावना यांना त्यांच्या मुलाने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे पोलिसांनी जाऊन भावना यांचा जबाब घेतला.