संगमेश्वर : आंबव येथील विहीरीमध्ये मृत अवस्थेत सापडला बिबट्या 

 

 

संगमेश्वर : तालुक्यातील आंबव, (कोंडकदमराव) येथे दि. २७/०३/२०२४ रोजी गणपत दौलत जोशी यांचे आंबा-काजू बागेमध्ये असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती गावचे पोलीस पाटील प्रकाश पांचाळ, यांनी दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली.

 

या मिळालेल्या माहितीचे अनुषंगाने वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता विहीरीमध्ये बिबट्या मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले. सदरील विहीर ही प्रकाश पांचाळ यांच्या आंबा-काजूच्या बागेमध्ये असून ती १० फूट व्यास, ३ फुट कटडा असलेली, २५ फूट खोल असून सदरची विहिर जांभा चिराने बांधकाम केलेली आहे. सदर विहीरीमध्ये ग्रामस्थांच्या मदतीने लाकडी शिडी विहीरीत सोडल्यानंतर खाली उतरुन दोरीचा फास टाकून बिबट्याला अलगद फासामध्ये अडकवून बाहेर घेण्यात आले.

 

विहीरीमध्ये पडलेल्या मृत बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशूवैद्यकीय अधिकारी देवरुख आनंदराव कदम याचे मार्फत मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. सदरचा बिबट्या हा मादी प्रजातीचा असुन त्याचे वय साधारणपणे २ ते ३ वर्षाचा असुन त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. बिबट्या हा भक्षाचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असल्याचे दिसून येते. सदर बिबट्यास लाकडाची चिथा रचुन जाळुन नष्ट केले.

 

सदर प्रकरणी पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संगमेश्वर करत आहेत.

सदरील कार्यवाही विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, व मा. सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, प्रकाश सुतार यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संगमेश्वर, तौफिक मुल्ला, वनरक्षक, आकाश कडूकर, अरुण माळी व पोलीस पाटील, प्रकाश पांचाळ, शशिकांत माने, प्रशांत जोशी, ग्रामस्थ उपस्थित होते. यांनी मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र.१९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे