लाकूड साठे गायब!
वृक्षतोडीचे ऑडिट होण्याची गरज –प्रमोद शिंदे
चिपळूण | संतोष सावर्डेकर : तालुक्यातील दसपटी विभागात बेसुमार जंगलतोड होत असल्याचे नांदिवसे येथे जप्त करण्यात आलेला लाकूड साठा आणि खडपोली येथे विना पास लाकडाची वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने पकडल्यानंतर समोर आले आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले लाकूड साठ्यांचे फोटो पाहता ही कारवाई तोकडी झाली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे या विभागात झालेल्या वृक्षतोडीचे ऑडिट व्हावे, अशी मागणी दसपटी विभागातील पर्यावरणप्रेमी प्रमोद शिंदे यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून चिपळूणच्या ग्रामीण भागात जंगलतोड होत असल्याची ओरड आहे विशेष म्हणजे २२ जुलै २०२१ च्या महापुरानंतर सह्याद्रीच्या खोऱ्यातील जंगल तोडीचा मुद्दा सातत्याने गाजत आहे. दसपटीतील सह्याद्रीच्या खोऱ्यात वारंवार जंगलतोड होत असल्याने डोंगर उताऱ्यांवर जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. भूवैज्ञानिक व काही पर्यावरण अभ्यासकांनी देखील याविषयी परखड मत व्यक्त करत प्रशासनाने लाकूडतोड्या विषयी ठोस कारवाईची मागणी केली होती. कोळकेवाडी अवजल अभ्यास गटाने ही कायमस्वरूपी जंगल तोडीची शिफारस आपल्या अहवालात केली आहे. परंतु, जंगलतोड थांबत नसल्याने या भागातील अनेक गावातील डोंगर उतार पुरते उजाड झाले आहेत. या भागात सरकारी जंगल नसले तरी खाजगी मालकीच्या जमिनीमध्ये ही लाकूडतोड होत असून ती अमर्याद आहे.
जंगलतोडीसाठी गावातूनच रस्ते व अन्य सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. त्यासाठी जंगलात थेट जेसीबी फिरवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे गावाच्या विकासात महत्वपूर्ण ठरणाऱ्या पाखाड्या असो, अथवा रस्ते असो, किंवा स्मशानशेडसाठी जागा असो, अन्य सुविधांसाठी जागा देण्यासाठी शेतकरी अथवा जमीन मालक सहकार्य करत नसल्याचे देखील वारंवार समोर येत असते. परंतु जंगल तोड व वाहतुकीसाठी जागा देताना कोणतीही कुरकुर नसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान गेल्याच आठवड्यात नांदिवसे ओवळीतील जंगल तोडी संदर्भात पर्यावरणप्रेमी प्रमोद शिंदे यांनी तक्रार केली आहे. त्याचबरोबर चिपळूणातील पर्यावरण प्रेमींनीही सह्याद्रीच्या खोऱ्यातील जंगल पालथे घालत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे जंगल तोडीचे भीषण स्वरूप समोर आले आहे. या जंगलतोडीबाबत सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
चौकट
वृक्षतोडीचे ऑडिट आवश्यक
याबाबत पर्यावरणप्रेमी प्रमोद शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, सह्याद्रीच्या खोऱ्यात चिपळूण आणि पुढे सातारा जिल्ह्याच्या हद्दीपासून जंगलात बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. प्रत्यक्षात दिले गेलेले परवाने तोडलेली झाडे आणि त्या बदल्यात लागवड केलेली असे सर्वांचे ऑडिट करणे महत्त्वाचे आहे. तसे झाल्यास नक्कीच यातील सत्य बाहेर येईल असे म्हटले आहे.
चौकट
अभियान, योजना कशाला राबवायच्या?
तर नदी समन्वयक शहानवाज शाह यांनी म्हटले आहे की, नदी समन्वयक जलदूत जलप्रेमी निसर्गप्रेमी हे भूजल साठा वाढावा. याकरता स्वतःची कामे बाजूला ठेवून विना मोबदला उन्हातानातून मेहनत घेत आहेत. झाडे लावित आहेत आणि हे लोक जंगल नष्ट करीत आहेत. गेल्या ८ मार्चपासून या दसपटी भागातील वृक्षतोड उघड होत आहे. विनापरवाना साठे मिळत आहेत. विनापरवाना अनधिकृत मालाची दिवसाढवळ्या वाहतूक करण्याचे धाडस कसे केले जाते ? हा मूळ प्रश्न आहे. तसे असेल तर या मग या योजना अभियान कशाला राबवायचे? सगळा सह्याद्री वनखाते व लाकूड व्यापाऱ्यांनी मिळून बोडका करूनच टाकावा. कशाला हवा ? भूजल साठा ? कशाला हवा पाऊस ? कशाला हवा निसर्ग ? दोघांनी मिळून संपवून टाका एकदाचा सह्याद्री अशा संतप्त शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.