चिपळुणातील ९ गावे ९३ वाड्यांमध्ये पाणी टंचाई

कडक उन्हाळा, टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होण्याची शक्यता

चिपळूण (प्रतिनिधी) : गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यावर्षी तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यात सावर्डे, टेरव, कुडप, कोंडमळा, कादवड, अडरे, अनारी, आगवे, डेरवण या ९ गावातील १३ वाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या प्रशासनाकडून एका टँकरव्दारे या गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस कडक उन्हाचे चटके जाणवत आहेत.

नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटू लागल्याने भविष्यात टंचाईग्रस्त गाव व वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या ३० वर्षाच्या कालावधीत गावोगावी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या असल्या तरी पाणी टंचाई संपुष्टात आलेली नाही. तालुक्यातील पुर्व विभागातील अनेक गावांना टंचाईचा तडाखा बसतो आहे. पाच वर्षापूर्वी तिवरे धरण फुटले. अद्याप त्याची उभारणी झाली नसल्याने तिवरे नदीवर अवलंबून असलेल्या गावांनाही टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

गतवर्षी तालुक्यातील टंचाईग्रस्त १७ गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. यामध्ये अडरे, कामथे खुर्द, कोसबी, नारदखेरकी, रिक्टोली, कळकवणे, कळंबट, नांदगाव खुर्द, तिवडी, निवळी, शिरवली, सावर्डे, कादवड, गाणे, ओवळी, आकले व येगाव या गावातील काही वाड्यांचा टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. त्यामध्ये सर्वाधिक ९ धनगरवाड्यांचा समावेश होता. गतवर्षी चिपळूण तालुक्याचा टंचाई आराखडा ७१.६० लाख तर यावर्षी आराखडा पावणेतीन कोटीवर पोहोचला आहे.
डेरवण धरणात पाणी नसल्याने यावर्षी सावर्डे, डेरवण येथेही भीषण पाणी टंचाईची समस्या आहे. दुसरीकडे टेरव येथील जलजीवनची पाणी योजना अर्धवट राहिली. परिणामी संपूर्ण गावास टंचाईच्या झळा बसत आहेत. कादवड येथील दोन्ही धनगरवाड्यांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. कोंडमळा आणि कुडप धनगरवाडीला तर पाणी टंचाई पाचविलाच पुजलेली आहे. याबरोबरच अडरे, अनारी, आगवे गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गावांना टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.