नांदगाव तिठा येथील मारहाण प्रकरणात वडील – मुलाला अटक

न्यायालयात केले हजर ; एक दिवसाची पोलीस कोठडी

कणकवली : नांदगाव तिठा येथे मोबाईल काढून घेत मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. नांदगाव सरपंच रविराज धोंडू मोरजकर (४६, रा. नांदगाव सिसयेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कमलेश सुरेश मोरये (३९) व सुरेश अर्जुन मोरये (६२, दोघेही रा. नांदगाव तिठा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कमलेश सुरेश मोरये यांच्या फिर्यादीवरून भूपेंद्र मोरजकर, रविराज मोरजकर, केदार खोत (तिघेही रा. नांदगाव सिसयेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित कमलेश मोरये व सुरेश मोरये यांना अटक करण्यात आली असून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही घटना गुरुवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. रविराज मोरजकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी मोटरसायकलने सायंकाळी घरी जात असताना कमलेश मोरये व सुरेश मोरये यांनी नांदगाव तिठा येथे मला अडवले. त्यानंतर आताच्या थापटाने मारहाण करून खिशातील मोबाईल काढून घेतला. सुरेश मोरये हे बांबुची काठी घेवून आल्यावर कमलेश मोरये याने माझ्या बरगडीच्या खाली दगड मारुन दुखापत केली. तसेच माझा भाऊ भूपेंद्र मोरजकर याच्या खांदयावर व पाठीवर बांबू मारत दुखापत करून शिवीगाळ करत धमकी दिली. असे म्हटले आहे. याप्रकरणी संशय आरोपींवर कणकवली पोलीस ठाण्यात भा.द. वी कलम ३२७, ३२४, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत आहेत.

तर कमलेश मोरये यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी नांदगाव तिठा येथील सुकमन बार येथे उभा होतो त्यादरम्यान भूपेंद्र मोरजकर, रविराज मोरजकर, केदार खोत हे तेथे येत शिवीगाळ करू लागले. तसेच केदार खोत यांनी लाकडी दांड्याने मारहाण केली, त्यावेळी भूपेंद्र मोरजकर याने माझा मोबाईल चोरून नेला. त्यादरम्यान माझे वडील सुरेश मोरये हे मध्यस्थी करण्यासाठी तेथे आले असता भूपेंद्र मोरजकर याने त्यांच्या मानेवर लाकडी बांबूने मारहाण करून दुखापत केली तसेच शिवीगाळ केली असे म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस चंद्रकांत झोरे करत आहेत.