रक्तदान शिबीरात ४१ जणांनी केले रक्तदान
राजापूर l प्रतिनिधी राजापुरातील मातोश्री ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर, मशाल दौड व सायंकाळी मिरवणूक अशा विविध कार्यक्रमांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या विविध उपक्रमांत व शिवजयंती उत्सवात मातोश्री ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांसह नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. रक्तदान शिबीरात ४१ जणांनी केले रक्तदान केले.
राजापुरातील मातोश्री ग्रुपच्या वतीने दरवर्षी शिवजयंती उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षही मातोश्री ग्रुपच्या वतीने शिवजयंती उत्सवाच्या दिवशी सकाळी नाटे येथील घेरा यशवंतगड नाटे ते जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राजापूर अशी मशाल दौड काढण्यात आली. पहाटे ५ वाजता नाटे घेरायशवंतगड येथून ही दौड सुरू झाली व राजापुरात सकाळी ७ वाजता पोहचली. या मशाल दौडचे नाटे ते राजापूर मार्गावर जागोजागी उस्फुर्त स्वागत करण्यात आले. यात मातोश्री ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते. या मशाल दौडची सांगता जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ छत्रपतींच्या पुतळयाला अभिवादन करून करण्यात आली.
यावर्षी शिवजयंतीच्या आदल्या दिवशी २७ मार्च रोजी मातोश्री ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात ४१ जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी सर्व रक्तदात्यांना राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सायंकाळी शिवजयंती उत्सवानिमित्त राजापूर हायस्कुल ते जवाहर चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या मिरवणूकीतही मातोश्री ग्रुपने सहभागी होत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. जवाहर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून मातोश्री ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अभिवादन केले. मातोश्री ग्रुपच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.










