हरळ द्वितीय तर शेढे तृतीय
पाचल (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील तळवडे येथील श्री नवलादेवी क्रिडा मंडळ तळवडे आयोजित ढोलवादन स्पर्धेत राजापूर येथील धुतपापेश्वर ढोल पथकाने प्रथम क्रमांक पटकावला.
तळवडे येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच गायत्री साळवी यांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेचे तळवडे होळीचामांड येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे उद्घाटन उद्योगपती किरण ऊर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या सुकन्या अॅड. अपूर्वा सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच गायत्री साळवी, मानकरी वामन तात्या गुरव, शिवकुमार लिंगायत, बाळकृष्ण पराडकर, माजी प्राथमिक शिक्षक सखाराम साळवी, सत्कार मुर्ती जेष्ठ समाज सेवक आप्पा साळवी, उपसरपंच यशवंत साळवी, माजी सरपंच प्रदीप प्रभुदेसाई, चंद्रकांत गुरव युवा कार्यकर्ते राजेश उर्फ बाळू दाद साळवी,शैलेश साळवी,सुनिल गुरव संदिप गुरव, नंदकुमार गुरव, दिलीप चिले, अमित साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण दहा संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांकाचे रोख रूपये ११ हजार १११ व चषक राजापूरच्या धूतपापेश्वर ढोलवादन पथकाने पटकावला तर द्वितीय क्रमांकाचे रोख रूपये ७ हजार ७७७ व चषक हरळ गावच्या धावजीदेव ढोलवादन पथकाने मिळविला. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रूपये ५५५५ व चषक नवलाई ढोलवादन पथक शेढे यांनी पटकावले. उत्तेजनार्थ बक्षीस महालक्ष्मी माता ढोलवादन पथक सोल्ये यांना देण्यात आले. साळवी कुटुंबांनी आप्पा साळवी यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून एक आगळ्या वेगळ्या चांगला आदर्श निर्माण केल्याबद्दल या कुटूंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजु कुलकर्णी व राजेश तेरवणकर यांनी पंच म्हणून उत्तम कामगिरी बजावली.











