चोरद नदीपात्रात धुतल्या जाणाऱ्या वाहनांवर बंदी नाहीच

नदीपात्र होतेय दूषित; लवकरच तहानलेल्या गावांना होणार टँकरने पाणीपुरवठा
 खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील सुकिवली चोरद नदीपात्रात वाहने धुणाऱ्यांचे प्रकार थांबता थांबेनासे झाले आहे. छोट्या-मोठ्या वाहनांसह अजख क्रेनही वाहनचालकांकडून सर्रासपणे नदीपात्रात वाहने धुतली जात असल्याने ऑईल मिसळून पाणी दूषित होत आहे. काही दिवसाने याच नदीपात्रातून तहानलेल्या गाव-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, प्रशासन अजूनही सुस्तच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चोरद नदीपात्र आरक्षित करण्यात आले आहे. नातूनगर धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने चोरद नदीपात्र बारमाही वाहत असते. तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना पाणीटंचाई संपुष्टात येईपर्यंत याच नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. येथील पंचायत समितीकडे ५ गावातील १३ वाड्यांनी टँकरच्या पाण्यासाठी अर्जही दाखल केले आहेत. यामुळे लवकरच या गावांना टँकरने पाणीपुरवठाही सुरू करण्यात येणार आहे. मात्र, तरीही नदीपात्रात सर्रासपणे वाहने धुतली जात आहेत.
या नदीपात्रानजीक परप्रांतिय कामगार रोजगारानिमित्ताने नदीलगतच वास्तव्यास आहेत. हे कामगारही याच नदीपात्रात स्नान, कपडे धुवत असतात. याशिवाय लगतच्या वस्तीतील महिलाही चोरद नदीकिनारी कपडे धुण्यासाठी सतत येत असतात. यामुळे नदीपात्रातील पाणी दूषितच होत असते. यात आता नदीपात्रात वाहने धुणाऱ्यांचीही भर पडली असून दिवसाढवळ्याही सर्रासपणे वाहने धुतली जात आहेत. नदीपात्रात दिवसाढवळ्या व रात्रीच्या सुमारासही सर्रासपणे वाहने धुतली जातात. चिकन विक्रेते, फळे व भाजी व्यावसायिकांसह अन्य नागरिक नदीपात्रात वाहने धुतात. येथे वाहने धुणाऱ्यांवर प्रशासन कुठलीच कारवाई करत नसल्याने नदीपात्रात वाहने धुणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे.