तळवलीत उद्या रंगणार दोन बहिणींचा अनोखा पालखी भेट सोहळा

 

गुहागर l प्रतिनिधी :        तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवी व पेवे गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवीचा शिमगोत्सव सध्या मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दोन बहिणींचा पालखी भेट सोहळा उद्या गुरुवार दिनांक 4 रोजी तळवली ग्रामदेवता सहाण येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

यावेळी पेवे गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवीची पालखी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाचवत तळवली सहाण येथे आणली जाईल तर तळवली ग्रामदेवता श्री सुकाई देवीची पालखी देखील आपल्या बहिणीच्या स्वागताला नाचवत आणली जाईल. यानंतर भव्य असा अनोखा पालखी भेट सोहळा पार पडून दोन्ही पालख्या नाचवण्याचा कार्यक्रम देखील पडणार आहे. या सोहळ्यासाठी विविध ठिकाणाहून भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात.यावेळी जणू तळवली गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.या पालखी भेट सोहळ्यासाठी सर्व भाविकांची उपस्थित राहण्याचे आवाहन तळवली ग्रामदेवता कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण व सचिव प्रदीप चव्हाण यांनी ग्रामदेवता कमिटीच्यावतीने केले आहे.