खेड(प्रतिनिधी) दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी विक्रीच्या व्यवहारातून शासनाला मोठा महसूल मिळतो. मार्चमध्ये २३ आणि २४ मार्च तसेच २९ ते ३१ मार्च, असे पाच दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. मात्र राज्य सरकारच्या पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने दुय्यम निबंधक कार्यालये उपरोक्त दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे राज्यातील सर्व शहर आणि ग्रामीण दुय्यम निबंधक कार्यालयात शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही कामकाज सुरू होते. खेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात आलेल्या पाच दिवसांच्या शासकीय सुट्ट्यांच्या दिवसात एकूण १३ दस्त्त नोंदवण्यात आले आहेत. या दस्त नोंदणीसाठी शासनाला मुद्रांक शुल्क म्हणून ९ लाख १८ हजार ६०० रूपये तर नोंदणी शुल्क म्हणून ८९ हजार ३५० रुपये असा एकूण १० लाख ७ हजार ९५० रुपयांचा सुट्टीतील अतिरीक्त महसूल मिळाला आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात विविध आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन विक्री केली जाते. शहरात आणि लगतच्या परिसरात उभ्या राहत असलेल्या गृह संकुलातील सदनिका, व्यावसायिक गाळे यांची विक्री सुरू असते. या सर्व खरेदी विक्रीच्या व्यवहारातून शासनाला कोट्यावधी रुपयांचा महसूल उपलब्ध होतो. खेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात १ ते ३१ या कालावधीत एकूण ३२३ दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. या खरेदी – विक्रीच्या दस्त नोंदणीतून शासनाला १ कोटी २ लाख ७० हजार ३३३ रूपये मुद्रांक शुल्क म्हणून तर १७ लाख ३७ हजार ५० रुपयांचा नोंदणी शुल्क म्हणून महसूल मिळाला आहे.









