वैभववाडी तालुक्यात लवकरच एमआयडीसी उभी राहील – आमदार नितेश राणे

खासदार राऊत यांच्या लेटर पॅडचा उपयोग निधी थांबवण्यासाठीच

वैभववाडी येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आ. राणे यांची टीका

वैभववाडी | प्रतिनिधी : जवळपास १०० कोटीचा निधी वैभववाडी तालुक्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. प्रत्येक गावात दोन ते तीन कोटी विकास निधी देण्याचे काम भाजपाच्या वतीने झाले आहे. मतदारसंघातून जाणाऱ्या तरेळे – कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र सरकारकडून २४९ कोटीचा निधी मिळाला आहे. लवकरच हा मार्ग देखील सुखकर होईल. त्याचबरोबर युवकांच्या हाती काम मिळावे, रोजगार मिळावा यासाठी पुढील पाच वर्षात तालुक्यात एमआयडीसी उभी राहील. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथे महायुतीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.

वैभववाडी तालुका हा नारायण राणे साहेबांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांच्यासाठी दिवस-रात्र काम करूया. इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यात मतं खेचून आणण्याची ताकद आहे. नियोजनबद्ध प्रचाराची रूपरेषा ठरवून ध्येय गाठण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आठ वर्ष विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आपण मला आशीर्वाद दिले. मागील दोन वर्षात आदरणीय नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावागावातील विकासासाठी शासनाकडून निधी खेचून आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

केंद्र शासनाच्या अनेक योजना गरीब गरजू जनतेसाठी उपयुक्त ठरत आहेत. जल जीवन मिशन या योजनेमुळे घर घर जल मिळणार आहे. कोरोनात धान्य व औषधे उपलब्ध करून देण्याचे काम ही आदरणीय मोदी साहेब यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी खा. विनायक राऊत यांच्यावर आ. नितेश राणे यांनी सडकून टीका केली. आता खळा बैठका घेणाऱ्या रावतांना जनतेने विचारले पाहिजे. कारखान्याकडे उसाच्या गाड्या जात नव्हत्या तेव्हा कुठे होता. दरवर्षी पावसाळ्यात करुळ व भुईबावडा घाट मार्ग बंद असतो त्यावेळी कुठे असता. असा जाब त्यांना जनतेंनी विचारला पाहिजे. राऊत यांचे लेटर पॅड केवळ विकास काम थांबवण्यासाठीच वापरले जाते. तालुक्याचा निधी थांबवणाऱ्या राऊत यांना मत देऊ नका असे नितेश राणे यांनी सांगितले.