कोरोनात औषधांचे कमिशन खाणारे लवकरच जेलमध्ये जातील – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

मी साहेब नाही, जनतेचा सेवक म्हणून यापुढेही कार्यरत

खा. राऊत यांना टक्केवारी न मिळाल्यानेच निधी अखर्चित

वैभववाडी येथे महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न

वैभववाडी | प्रतिनिधी : सन २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपामुळेच उध्दव ठाकरेंचे खासदार निवडून आले आहेत. आणि आज उद्धव ठाकरे मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत आहे. ठाकरेंना या निवडणुकीत जनताच तडीपार करेल. कोरोनात कमीशन खाणारे उध्दव ठाकरे हे केजरीवाल यांच्यासोबत जेलमध्ये दिसतील. अशी खरमरीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.


उबाठाचा खासदार विनायक राऊत यांनी ५७ टक्के खासदार फंड खर्च केला नाही. याला एकमेव कारण टक्केवारी हे आहे. ठेकेदाराकडून टक्केवारी न मिळाल्यामुळेच निधी खर्च केला नाही. असा घणाघात ही श्री नारायण राणे यांनी केला. आम्ही केलेली कामे ही जनतेसमोरच आहेत. ती नवीन सांगायची गरज नाही. यापुढेही मी तुमचा साहेब नाही, तर सेवक म्हणूनच काम करत राहीन असे अभिवचन नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना दिले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा सुवर्णा मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी आमदार नितेश राणे, निलमताई राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, वैभववाडी मंडळ अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती जयेंद्र रावराणे, प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, प्राची तावडे, नेहा माईणकर, हुसेन लांजेकर, संजय सावंत, राजा राणे, सुधीर नकाशे, शारदा कांबळे, बंड्या मांजरेकर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ५४ योजनांची अंमलबजावणी केलेली आहे. त्याचा पुरेपूर फायदा युवक व महिलांसाठी होत आहे, कोरोनात ८० कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचे काम हे त्यांनी केले आहे . दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यांनी पाच टक्के तरी जनतेला आधार दिला का? उलट त्यांनी औषधात कमिशन लाटण्याचे काम केले.

जगात कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून मोदींचा उल्लेख केला जातो. अनेक देशात मोदींचे कौतुक केले जात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत आपला देश १४ व्या क्रमांकावर होता. तो ५ व्या क्रमांकावर आणण्याची किमया आदरणीय मोदी साहेबांनी केली आहे. २०३० पर्यंत आपला देश तिसऱ्या क्रमांकावर असेल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
मोदींवर टीका करणारे उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त पाच खासदार आणि १६ आमदार आहेत. पुढील काळात तेही राहणार नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे. युवकांना नोकरी मिळावी यासाठी मोदीजींनी दहा वर्षात प्रयत्न केले आहेत. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण एकजूट राहून काम करूया असे सांगितले.
महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. उमेदवार जाहीर झाल्यानंतर जो उमेदवार असेल किंवा मी असेन परत जरूर भेटायला येईन. परंतु सर्व कार्यकर्त्यांनी घराघरात आजच संकल्प करा. ८० व ९० टक्के नको, काम करणाऱ्या पक्षाच्या मागे आपण शंभर टक्के उभं राहूया. एक गठ्ठा मतदान करूया. यापुढेही मी तुमचा सेवक म्हणून उभा आहे. असे नारायण राणे यांनी सांगितले.

नारायण राणे यांनी या विधानसभेच्या आमदार नितेश राणे यांनी तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले, तुमचा आमदार हा केवळ नामधारी नसून हा खऱ्या अर्थाने तुमचा सेवक आहे. या मतदारसंघात रस्ते, विज, आरोग्य, पाणी व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. विकास कामात नितेश राणे हे नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. राज्यात इतर आमदारात नितेश राणे हा नक्कीच उजवा आमदार आहे. जनतेसाठी काम करतोय असे राणे साहेब यांनी सांगितले. या मतदारसंघात मला अजिबात चिंता नाही. नितेश राणे यांच्यावर असलेले तुमचे प्रेम बघून खूप समाधान वाटले. नितेश राणे यापुढेही काम करत राहिल. आपणही त्यांना असेच प्रोत्साहन देत रहा. लोकप्रतिनिधींनी जनतेसाठीच काम करायचं असतं असं नारायण राणे यांनी सांगितले. उपस्थित सर्व जनतेला नारायण राणे यांनी गुढीपाडवा व ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.