प्रतिनिधी: मंडणगड :गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाची सुरूवात करणारा सण आहे. या दिवशी नवीन वर्षासाठी अनेक संकल्प करतो. यंदा
एसटी महामंडळाने सर्व बसस्थानके, बसस्थानकाचा परिसर, बसस्थानकावरील प्रसाधनगृहे स्वच्छ निटनेटकी व प्रसन्न राहतील असा संकल्प केला त्या अनुषंगाने सुरूवात म्हणून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मंडणगड बसस्थानक स्वच्छ्ता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता मोहिमेत अनेकांनी स्वंयस्फुर्तपणे सहभाग नोंदवून श्रमदान केले. या अभियानाच्या माध्यमातून मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरचा परिसर, मध्यवर्ती बस स्थानकाची इमारत, याशिवाय बस स्थानकाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छता अभियान अंतर्गत आगाराच्या कार्यकक्षेतील सर्व बसस्थानक, बसस्थानक परिसर व प्रसाधनगृहांची सखोल स्वच्छता करण्यात आली.
बसस्थानक परिसरातील दगडधोंडे, मातीचे ढिगारे, अनावश्यक झाडे-झुडपे, दिर्घकाळ साचलेला कचरा स्वच्छ करण्यात आला. बसस्थानकातील छत, पंखे, उंच भिंती यावर साचलेल्या आळी-जळमटे काढून घेण्यात आली. बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंतीचे कोपरे, रा.प. महामंडळाची सर्व कार्यालये फिनेल टाकून ब्रशने धुवून घेवून त्यानंतर मॉपच्या सहाय्याने घासून, स्वच्छ पुसून स्वच्छ करण्यात आले.
बसस्थानक परिसरातील सर्व आस्थापना, आस्थापना धारकांकडून स्वच्छ निटनेटक्या व कचरामुक्त करून घेण्यात आले. बसस्थानकावरील चालक, वाहक, महिला विश्रांतीगृह, प्रसाधनगृह यांची देखील स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेसाठी मंडणगड आगार प्रमुख सतीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच स्थानक प्रमुख प्रज्ञा दरीपकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोबत विश्वभुषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आंबडवे येथील विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच महाविद्यालयातील सहा. प्रा अरुण ढंग तसेच सहा प्रा मंगेश ठसाळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अमोल सकपाळ तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.












