मालवण शहरात 15 एप्रिल पासून एक दिवस आड पाणीपुरवठा

मालवण | प्रतिनिधी : उन्हाळा कालावधीत धामापूर तलाव क्षेत्रातील कमी होत असलेली पाण्याची पातळी लक्षात घेता मालवण पालिकेच्या वतीने धामापूर तलावाच्या माध्यमातून शहर परिसरात सुरु असलेला नळपाणी पुरवठा एक दिवस आड करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेमार्फत शहरात करण्यात येणारा पाणीपुरवठा १५ एप्रिल पासून दिवसाआड करण्यात येईल याची सर्व पाणी कनेक्शन धारकांनी नोंद घ्यावी व पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

झोन एक मध्ये १५ एप्रिल रोजी शहरातील आडारी रोड गणपती मंदिर पर्यंत, नारायण मंदिर समोरील परिसर, शांतीसागर मैदान परिसर, पेट्रोल पंप समोरील परिसर, कुडाळकर हायस्कूल जवळील परिसर, रेडकर हॉस्पिटलच्या आजूबाजूचा परिसर, गवंडीवाडा, दांडी मोरेश्वर मंदिर परिसर, आडवण वायरी रोड, रामेश्वर मंदिर मागील परिसर, सातेरी मंदिर जवळील परिसर या भागात पाणीपुरवठा होईल तर झोन दोन मध्ये १६ एप्रिल रोजी धुरीवाडा गारुडेश्वर मंदिर पर्यंत, श्रीकृष्ण मंदिर परिसर, चिवला बीच ते चौकचार रोड, कोतेवाडा कचेरी रोड, मेढा काळबादेवी रोड, पोलीस वसाहत ते राजकोट, जय गणेश मंदिर परिसर, भूत आंबा ते रेवतळे चर्च रोड, फाटक शाळा परिसर, भरड ते बंदरजेटीपर्यंत, लिमये हॉस्पिटल ते पोस्ट ऑफिस समोरील परिसर या भागात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. अश्या स्वरूपात एक दिवस आड पाणीपुरवठा होणार आहे.