पेडणे (प्रतिनिधी) :
दयानंद वेंगुर्लेकर हे संवेदनशील व प्रतिभाशाली कवी आहेत. विविध भाव भावनांचा त्यांच्या कवितांमधून उत्कट आविष्कार घडतो. कवितेत जीवनाविषयीचे आत्मचिंतन व विचारमंथन आहे. ओंजळीतली बकुळफुले हा वेंगुर्लेकरांचा काव्यसंग्रह म्हणजे निसर्ग, समाज व मानवी जीवनाचे चिकित्सक बुद्धीने केलेले समीक्षण आहे. प्रगल्भ काव्य वैशिष्ट्यामुळे त्यांच्या कविता शाळा, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास भावी पिढीसाठी त्यांच्या साहित्याचा मोठा लाभ होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य समीक्षक तथा शिवाजी इंग्लिश हायस्कुल कुडाळचे निवृत्त मुख्याध्यापक सुधाकर वळंजू यांनी कोरगाव पेडणे येथे केले.
सातेरी प्रकाशन व युवा प्रतिष्ठान, कोरगाव आयोजित ओंजळीतली बकुळफुले पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कमळेश्वर देवस्थान सभामंडपात आयोजित केला होता. कवी दयानंद वेंगुर्लेकर यांच्या या पहिल्या काव्य संग्रहाचे प्रकाशन केल्यानंतर प्रमुख वक्ते या नात्याने प्रा. वळंजू व्यासपीठावरून बोलत होते.
याप्रसंगी वळंजू यांच्यासोबत कवयित्री सोनाली परब, भगवती हायस्कुल पेडणेच्या मराठीच्या शिक्षिका प्रिया टांकसाळी , कमलेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गुरुनाथ प्रभु, कवी दयानंद वेंगुर्लेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सोनाली परब म्हणाल्या, दयानंद वेंगुर्लेकर यांनी बकुळफुलेच्या माध्यमातून आपल्या मातीशी नाते सांगणारा सर्जनशील काव्यसंग्रह जन्माला घातला. काव्यात वापरलेले त्यांचे शब्द विश्व जेवढे दर्जेदार आहे तेवढेच ते वाचकांच्या मनात सहजतेने घर करून राहणारे असल्याने त्यांचे पुस्तक वाचकाना नक्कीच आवडेल.
दशावतारी आख्यानातील स्त्रीपार्टी हे दयानंद वेंगुर्लेकरांचे पहिले प्रकाशित पुस्तक आहे. त्यांचे लेखन हे वास्तवाचे सजगपणे चित्रण घडवणारे आहे. विशिष्ट चौकटीबाहेर जाऊन निर्भीडपणे आपल्या कल्पना मांडण्याची त्यांच्यात उपजत कला आहे. त्याचाच परिपाक म्हणजे हा काव्य संग्रह आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रिया टांकसाळी म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायक प्रेमनाथ पाळणी यांनी ईशस्तवन सादर केले. देवानंद गावडे यांनी परिचय केला. अमोघ सावंत यांनी सर्व मान्यवरांना भेटवस्तू प्रदान केल्या. कवी दयानंद वेंगुर्लेकर यांनी प्रास्ताविकपर भाषण करताना हे पुस्तक कसे घडले याचा ऊहापोह केला. कोलवाळच्या सेंट रिटा हायस्कुलच्या शिक्षिका दीपाली खोर्जूवेकर व प्रियांका गुरव यांनी पुस्तकातील निवडक कवितांचे वाचन केले. नवसो परब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रणेश गुरव यांनी आभार मानले.












