पथकाकडून ६३ टक्के कर वसुली, १५ थकित करदात्यांना बजावल्या नोटीस
खेड(प्रतिनिधी) खेड नगरपरिषदेने मार्च अखेरीस थकित करदात्यांकडील कराची रक्कम वसूल करण्यासाठी हाती घेतलेली मोहीम तीव्र केल्याने ६३.०६ टक्के वसुली करण्यास वसुली पथकाला यश आले आहे. तसेच ५ थकित करदात्यांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या असून १५ थकित करदात्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
प्रभारी मुख्याधिकारी चेतन विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यासाठी थकित पाणीपट्टीधारकांच्या नळजोडण्या तोडण्याची मोहीम हाती घेतली होती. या कारवाईचा अनेक थकित करदात्यांनी धसका घेत पाणीपट्टीची रक्कम भरणा करणे पसंत केले. अजूनही १४ थकित पाणी पट्टीधारकांनी पाणीपट्टी न भरल्याने त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
यापाठोपाठ घरपट्टी व मालमत्ताधारकांचीही कराची रक्कम वसूल करण्यासाठी वसुली पथकाने सुरूवातीला डोअर टू डोअर जावून सूचना केल्या. यानंतर काही थकित करदात्यांना नोटीस बजावण्यात आल्या. यातील थकित करदात्यांनी कराची रक्कम भरणा करत प्रशासनाला सहकार्य केले. याचमुळे नगरपरिषदेची ६३.०६ टक्के कराची रक्कम वसूल झाल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित १५ थकित करदात्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.











