माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल मधील गुरुकुल पूरक उपक्रमातील विद्यार्थ्यांनी माखजन येथील श्री राम मंदिरात गायन सेवा केली.
प्रशालेतील संगीत शिक्षक विशारद गुरव व गुरुकुल पूरक उपक्रम प्रमुख सचिन साठे यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली होती.कबीराचे विणतो शेले,निघालो घेऊन दत्ताची पालखी,आनंदी आनंद झाला,प्रभुरामाने दर्शन द्यावे,आदी गाणी सादर केली.या सोबतच रामरक्षा,मारुती स्तोत्र,गणपती अथर्वशीर्ष,ओंकार साधना,व पसायदान म्हटले.
संगीत शिक्षक विशारद गुरव यांनी गीत रामायणातील काही गाणी सादर करून श्रोत्यांची मने रिझवली.विद्यार्थ्यांनी श्री राम मंदिरात येऊन केलेल्या गायन सेवेबद्दल मंदिर व्यवस्थापनाने कौतुक केले.विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी संधी दिल्याबद्दल शाळेने देवस्थान चे आभार व्यक्त केले.
यावेळी शाळेकडून विद्यार्थ्यांसमवेत संगीत शिक्षक विशारद गुरव,गुरुकुल उपक्रम प्रमुख सचिन साठे,ओंकार मुळे आदी उपस्थित होते.











