राजापूर (वार्ताहर): राजापूर अर्बन बँकेचे ज्येष्ठ सभासद आणि तालुक्यातील आडिवरे कालिकावाडी येथील अष्टपैलु व्यक्तीमत्व आणि सेवानिवृत्त शिक्षक, लेखक श्रीकांत पाध्ये यांचा येथील राजापूर अर्बन बँकेच्या वतीने नुकताच हृदय सत्कार करण्यात आला.
कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले पाध्ये हे बँकेचे जुने सभासद आहेत. श्री. पाध्ये वयाच्या ७९ व्या वर्षीही समाज प्रबोधन आणि विविध क्षेत्रात करीत असलेल्या कामाची दखल घेवून राजापूर अर्बन बँकेच्या वतीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांच्या हस्ते बँकेचे ज्येष्ठ संचालक विजय पाध्ये यांच्या उपस्थीतीत शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे कर्मचारी महेश पुजारी, शोएब कुडाळकर उपस्थित होते.
यावेळी श्री. अहिरे यांनी श्री. पाध्ये यांच्या कार्याचा गौरवपर उलेख केला. श्री. पाध्ये हे ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना जि. प. तसेच शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. त्यांनी उमेदीच्या काळात आकाशवाणीवर लोक संगीत आणि भक्तीसंगीताचे सादरीकरण केलेले आहे. तसेच ते उत्तम तबलावादक असून अनेक संगीत मैफिलीत यांनी तबला साथ केलेली आहे. तसेच विविध वृत्तपत्रात त्यांनी प्रसंगोचित लेखन केले आहे. तर अनेक मासिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिध्द झालेले आहेत. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा, सामाजिक समस्या, समाजातील नररत्ने यावर त्यांनी लेख लिहिले आहेत.










