सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात सुशिक्षित जिल्हा असून तेथील जास्तीत जास्त युवक आणि युवती उच्च शिक्षण घेऊन मुंबई आणि गोव्यासारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात आणि चाकरमानी म्हणून तिथेच काम शोधतात याचे मूळ कारण येथे उपलब्ध नसलेल्या रोजगाराच्या संधी.
पण येथे रोजगार जरी उपलब्ध नसला तरी कोकणचे निसर्ग सौंदर्य आणि समुद्र किनारा पाहण्यासाठी लाखो लोक सिंधुदुर्गात येतात पण मग याना लागणाऱ्या वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, शोभेच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, मसाले, आणि अनेक अशा वस्तू बनवल्या तर त्यातून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण होऊ शकते आणि या अनुषंगाने कोकण संस्था गेली अनेक वर्षे काम करत असून या कामात अनेक प्रशिक्षक, डॉक्टर्स, सरपंच आणि अनेक ग्रामविकास अधिकारी अशी अनेक मंडळी या कामात संस्थेला हातभार लावतात. त्यातील काही मंडळी जी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मेहनतीने आणि तळमळीने कार्यरत आहेत तर काही डॉक्टर्स लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठीचे अहोरात्र रुग्ण सेवा बजवात आहेत आणि अशाच कार्यतत्पर लोकांचे एक चर्चा सत्र आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी २० एप्रिल २०२४ रोजी सावंतवाडी येथील शिल्पग्राम मध्ये कोकण संस्थेने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात जिल्ह्यातील अनेक प्रशिक्षक, नामवंत डॉक्टर्स, ग्रामविकास अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामविकास कार्यकर्ते सहभागी होणार असून ग्रामविकासाच्या असणाऱ्या संधी आणि उपाययोजना यावर चर्चा करणार आहेत.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्गातील पदमश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे, तहसीलदार श्रीधर पाटील, नाबार्डचे जिल्हा प्रमुख अजय थुटे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे यशवंत पाटकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण परब, कोकण संस्थाध्यक्ष दयानंद कुबल, कोकण संस्था प्रोजेक्ट हेड, प्रीती पांगे, मानव संसाधन व्यवस्थापक जयश्री खोपकर,स्वाती नलावडे कार्यकारी व्यवस्थापक सुरज कदम, साक्षी पोटे, सिंधुदुर्ग जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत आदी अनेक मान्यवर उपस्थित होते
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यात पुढाकार घेणाऱ्या प्रशिक्षकांचा आणि आरोग्य सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांचा कोकण संस्थेच्या वतीने सन्मान करण्याची संधी मिळाल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी संस्थेचे आभार मानले.
प्रशिक्षकांमुळे सिंधुदुर्गातील महिला रोजगार मिळवत आहेत, स्वयंरोजगार, व्यवसाय वृद्धिंगत होत आहेत आणि सर्वानी प्रयत्न केल्यास सिधुदुर्ग जिल्हा व्यावसायिकरित्या स्वयंपूर्ण होईल आणि नोकरीसाठी स्तलांतराचे प्रमाण कमी होऊन महिला युवक जिल्ह्यातच उपजीविकेचे साधन निर्माण करतील असा विश्वास दयानंद कुबल यांनी व्यक्त केला.
कोकण संस्था कोकणातील सर्व जिल्ह्यात अशा प्रकारची प्रशिक्षणे घेत असून त्याला महिलांचा आणि युवकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे, असेही ते पुढे म्हणाले.
या कार्यक्रमाला अवंती गवस, प्रदीप पवार, वैष्णवी म्हाडगुत, साक्षी पोटे, हनुमंत गवस, शशिकांत कासले, स्वाती मांजरेकर, ऋचा पेडणेकर,मंजिरी घारे, भावना साटम, समीर शिर्के, सत्यवान भगत आदी संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन समीर शिर्के यांनी तर आभार प्रथमेश सावंत यांनी मानले.










