आमदार निकमांच्या लक्षवेधीवर सांस्कृतिक मंत्र्यांचे उत्तर
चिपळूण | संतोष सावर्डेकर : कोकणातील खेळे, नमन, जाखडी यामध्ये काम करणान्या कलाकारांना अनुदान आणि पेन्शन मिळण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडून शासनाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी या लोककलाकारांना अनुदान देण्याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच कोकणातील या लोककलाकारांचे सर्वेक्षण करून तज्ञ समितीमार्फत अनुदान देण्याच्यादृष्टीने कार्यपध्दत ठरवण्यात येईल असे सांगितले.
आमदार निकम यांनी कोकणातील या प्रसिध्द कलाप्रकारातील कलावंतांची गेल्या अनेक वर्षाची व्यथा अधिवेशनात मांडून सर्वांचे लक्ष वेधताना कोकणात खेळे, नमन व जाखडी हा कलाप्रकार प्रसिध्द असून अनेक वर्षे या कलाप्रकाराच्या माध्यमातून अनेक कलावंत आपली कला प्रदर्शित करून मनोरंजन व प्रबोधन करण्याचे काम करत आहेत. मात्र, बदलत्या काळानुसार हे अभिजात कोकणी कलाप्रकार काळाच्या ओघात गडप होण्याचा धोका संभवत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये लोककला अभिजात संस्कृतीचे दर्शन अखिल जगाला घडवितात. त्या कला संपुष्टात येऊ नयेत, बदलत्या काळाशी स्पर्धा करत त्यांना तग धरता यावा तसेच सांस्कृतिक व पारंपरिक कलेची लोकांना माहिती व्हावी आणि त्यांचे जतन व संवर्धन शेखर निकम करण्यासाठी राज्यात नाट्यसंगीत, नाट्य, चित्रपट तमाशा फड हंगामी तमाशा फड, लावणी कलापथक, दशावतार मंडळ, खडीगंमत कलापथक व शाहिरी पथके आदीना शासन ज्याप्रमाणे अनुदान पॅकेज देते. त्याचधर्तीवर मध्यकोकणातील या पारंपरिक व सांस्कृतिक कलाप्रकारांनादेखील उर्जितावस्था देणे, त्या टिकवून ठेवण्याकरिता अनुदान आणि कलाकार पेन्शन योजना शासन लागू करण्याची मागणी केली.
या लक्षवेधीला उत्तर देताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगुंटीवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये संघटीत व असंघटीत कलाक्षेत्रामध्ये अनेक कलाप्रकार आढळून येतात हे कलाप्रकार वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्याप्रकारचे दिसून येतात. कोकणातील लोककला प्रकारातील नमन किंवा खेळे आणि जाखडी हे महत्वाचे लोककला प्रकार आहेत. गेली अनेक वर्षे या कलाप्रकाराच्या माध्यमातून अनेक कलावंत आपली कला प्रदर्शित करून मनोरंजन व प्रबोधन करण्याचे काम करत आहेत.
बदलत्या कालानुसार हे अभिजात कोकणी कलाप्रकार कमीप्रमाणात सादर होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. राज्यातील कला व कलाप्रकारांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्यात तमाशा फड हंगामी तमाशा फड, लावणी कलापथक, दशावतार मंडळ, खडीगंमत कलापथक व शाहिरी पथके यांना भांडवली व प्रयोग अनुदान दिले जाते.
सध्या शासन निर्णयामध्ये नमन, खेळे व जाखडी यासाठी अनुदान तरतूद नसल्यामुळे या प्रकारचे अनुदान नमन, खेळे व जाखडी या कलाप्रकारांना देता येणे शक्य होत नाही. मात्र तरीही या कलाप्रकारांना अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. यासाठी लोककला प्रकारांचे इत्यंभूत सर्वेक्षण करून त्याची माहिती जमा करुन समितीमार्फत आवश्यकतेनुसार याबाबतची का इष्टांक ठरविण्यात येईल. लोककलाकारांना राज्यात राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत राज्यातील संघटित किंवा असंघटित प्रयोगात्मक लोकलेतील कोणत्याही पात्र कलाकारास मानधन मिळू शकते. राज्यामध्ये सध्या विविध कलाप्रकारातील अनेक कलाकारांना दरमहा समितीने नियत केलेल्या श्रेणीनुसार मानधन देण्यात येते, जाखडी व नमन, खेळे या प्रकारातील सदर योजनेचे निकष पूर्ण करणारे व निवड समितीने निवडलेल कलाकारही या योजनेसाठी पात्र ठरतील असेही स्पष्ट केले.