एकाचीही माघार नाही
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने आता निवडणूक रिंगणात 9 उमेदवार रिंगणात आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी ९ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले होते. ते सर्व अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच सोमवारी ९ पैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने हे सर्वच उमेदवार आता निवडणुकीत लढत देणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे, उबाठा गटाचे उमेदवार विनायक राऊत, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र आयरे, सैनिक समाज पक्षाचे सुरेश शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे मारुतीकाका जोयशी, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार तर शकील सावंत, अमृत तांबडे, विनायक लहू राऊत हे तीन अपक्ष उमेदवार असे मिळून एकूण नऊ उमेदवारांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अर्ज सादर केले होते.
महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी यांनी दोन अर्ज, उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी चार अर्ज तर अन्य उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. छाननीअंती हे सर्व अर्ज वैध ठरल्याने नऊ जणांची उमेदवारी अधिकृत झाली. सोमवारी (दि.२२) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. परंतु या उमेदवारांपैकी कुणीही माघार घेतली नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात हे नऊही उमेदवार लढत देणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.










