वेंगुर्ले l प्रतिनिधी :प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये बेमौसमी पावसामुळे काढणी पश्चात नुकसान झालेल्या भातपीक शेतक-यांची पीकविमा नुकसान भरपाई जवळजवळ वैयक्तिक स्तरावर पंचनामे होऊन सुदधा बाधीत शेतक-यांना अदयाप पर्यंत विमा कंपनीकडून नुकसानी जमा करण्यात आलेली नाही. ती तत्काळ करावी अन्यथा वेगळा विचार करावा लागेल असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना सिंधुदुर्ग तर्फे वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सन २०२३ मधील बेमौसमी पावसामुळे ब-याच शेतक-यांचे भात पिकाचे नुकसान झाले होते. त्याचे वैयक्तिक स्तरावर पंचनामे झालेले होते. जवळ जवळ पंचनामे करुन सहा महिने झालेले असून नुकसानी मिळाली नाही. त्यामुळे या संदर्भात शेतकरी संघटना व शेतकरी यांनी अनेक वेळा निवेदने कृषी विभागाला दिले आहेत. मात्र विमा कंपनीकडून याचे व जिल्हा विमा प्रतिनिधी कडून तसेच राज्य समन्वयक प्रतिनिधीकडून या बाबत ठोस उत्तर नसल्यामुळे शेतक-यांनाही आता आक्रमक भुमिका घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संघटना अध्यक्ष शामसुंदर कृष्णा राय, आलमेल फर्नांडिस, प्रदीप सावंत, लाडू परब, रमाकांत परब, राजन आरोलकर, यशवंत तेली यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.










