गोरगरीबांच्या घरात समृद्धी आणणाऱ्या पंतप्रधानांना पून्हा संधी देणे आपले कर्तव्य
महायुतीच्या माडखोल विभागीय मेळव्याला उदंड प्रतिसाद
सावंतवाडी । प्रतिनिधी :
विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून १९९० साली प्रथम या जिल्ह्यात आलो. त्यावेळी या जिल्ह्यात येत असताना एक शपथ घेतली की माझं उर्वरीत आयुष्य या कोकणच्या माझ्या मायभूमीच्या उत्कर्षासाठी घालवीन व हा माझा कोकण सुजलाम सुफलाम करेन. तसेच माझ्याकडून काहीही चुकीचं होऊ नये याची काळजी घेईन. त्यानंतर आमदार, मंत्री, मुख्यमंत्री व आता केंद्रीय मंत्री या नात्याने मी कोकणच्या विकासासाठी अहोरात्र काम केले. कारण या मातीशी माझं भावनिक नातं आहे त्यामुळे कोकणचा विकास हाच माझा ध्यास आहे, असे प्रतिपादन लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी केले.

माडखोल येथील महायुतीच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, सांगली सरपंच लवू भिंगारे, राजन राऊळ, प्राजक्ता केळुस्कर, किरण राऊळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, लोकसभेच्या या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी रत्नागिरी पासून ते दोडामार्गपर्यंत मी अनेक ठिकाणी सभा व मेळावे घेत आहे. मात्र माडखोल येथील आजच्या मेळाव्यात येथील आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी आपल्या मंडलातून ८० टक्के मतदान देण्याचा दिलेला शब्द निश्चितच कौतुकास्पद आहे. या विश्वासाने जर सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम केले तर समोरील उमेदवाराचे डिपॉझिट नक्कीच जप्त होईल असा विश्वास लोकसभा निवडणुकीतील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त करीत रवींद्र मडगावकर यांच्या कार्याचे कौतुक केले.
ही निवडणूक देशाचे भवितव्य घडविणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली दहा वर्षे या देशातील जनतेच्या उत्कर्षासाठी व समृद्धीसाठी करीत आहेत. मोदी दहा वर्षे पंतप्रधान आहेत. त्यापूर्वी दहाहून अधिक वर्षे ते गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत.आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी जनसेवेसाठी वाहिलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व त्यागी व समर्पित वृत्ती त्यामुळे आपल्या एकंदरीतच राजकीय जीवन प्रवासात त्यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा डाग नाही.केवळ देशाच्या विकासासाठी ते झटत आहेत. देशातील १४० कोटी जनतेच्या समृद्धीसाठी काम करीत आहेत. त्यामुळे त्यांचे हे कार्य अखंडित राहावे यासाठी त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे हे आपले कर्तव्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या काळात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशात कोरोना व्हॅक्सिन तयार करून देशातील १४० कोटी जनतेचे जीवन वाचविण्याचा प्रयत्न करीत होते त्याचवेळी या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे मात्र औषधांच्या आलेल्या पैशातून १५ टक्के कमिशन खात होते. त्यामुळे जनतेच्या जीवाशी खेळणारे उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी असलेले येथील खासदार यांचे भवितव्य अंधकारमय असून जनता आता त्यांना थारा देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मला मिळालेली पद ही माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे. त्याचप्रमाणे या कोकणच्या जनतेचे प्रेम व आशीर्वाद यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आजही आपलं प्रेम पाहून मी नेहमी भारावून जातो. या जिल्ह्यातील लोकांसाठी कितीही केलं तरी ते कमीच आहे. कोणत्या जन्मी या जनतेचे उपकार मी फेडू शकणार असा प्रश्न मला नेहमी पडतो. त्यामुळेच मी माझे संपूर्ण जीवन या कोकणी जनतेच्या सेवेसाठी वाहिलेलं आहे, असे भावपूर्ण उद्गारही त्यांनी यावेळी काढले.
कुडाळ तालुक्यातील शिवापूर आणि सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे या दोन गावातून कुडाळ आणि सावंतवाडी या तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याचा तिढा सुटला आहे. वन संज्ञा असलेल्या ३.७० हेक्टर जमिनीला कोल्हापूर जिल्ह्यात पर्यायी जमीन देऊन डायवर्जन ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या प्रस्तावास केंद्र सरकार च्या पर्यावरण, वन आणि जलवायु मंत्रालय ने मान्य दिली आहे. या पार्श्वभूमीवर यावेळी शिरशिंगे शिवापूर तसेच सांगली व अन्य गावातील पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आभार मानले.
या मेळाव्याला माडखोल विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही उपस्थिती पाहून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मेळाव्याचे समन्वयक तथा भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.अशाच प्रकारे सर्वांनी संघटितपणे काम केल्यास महायुतीचा मोठा विजय होईल, अशा शब्दांत त्यांनी त्यांचे कौतुक केले.












