संतोष वायंगणकर
समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेला राजापूर लोकसभा मतदार संघ खरंतर फक्त एकच टर्म म्हणजे पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये काँग्रेस उमेदवार कर्नल सुधीर सावंत यांना जनतेने विजयी केले.
पंतप्रधान राजीव गांधी हत्येनंतरची ती सहानुभूतीची लाट होती. त्या लाटेत कर्नल सुधीर सावंत विजयी झाले. परंतु तद्नंतर १९९६ साली शिवसेनेचे सुरेश प्रभू विजयी झाले. कर्नल सुधीर सावंत, प्रा. मधु दंडवते यांचा पराभव झाला. प्रा. मधु दंडवते सलग दुसऱ्यांदा पराभूत झाले होते. सुरेश प्रभूंचा हा विजयी शिवसेनेचा असला तरीही नारायण राणे यांनी शिवसेनेची कोकणात जी बांधणी केली त्याचा परिपाक होता.
त्याचबरोबर उच्चशिक्षित बँकिंग क्षेत्रात असल्याने सुरेश प्रभू चांगल मताधिक्य घेऊन विजयी झाले. १९९६ साली लोकसभेत कोकणचा शिवसेनेचा खासदार म्हणून निवडून गेले. विशेष म्हणजे १९९६ साली जसा राजापूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे सुरेश प्रभू विजयी झाले. तसे रत्नागिरी लोकसभा मतदार संघात अनंत गिते हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग यादोन्ही जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघात शिवसेनेची खऱ्याअर्थाने ‘एण्ट्री’ झाली. कोकणातील शिवसेनेची ‘एण्ट्री’ ही केवळ नारायण राणे यांच्यामुळेच शक्य झाली होती.
१९९६ साली शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांनी कर्नल सुधीर सावंत आणि प्रा. मधु दंडवते यांचा पराभव केला. समाजवादी कार्यकर्त्यांची संख्याही कमी झाली होती. फक्त त्यावेळच्या कुडाळ-वेंगुर्ले मतदार संघात पुष्पसेन सावंत यांनी आपला मतदार संघ राखला होता. तर पुण्यातील ऊसतोड कामगारांचे नेते साथी किशोर पवार यांनीही समाजवादी मतं टिकवून रहावीत यासाठी देवगड विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढवली होती. साथी किशोर पवार यांना आपला पराभव माहिती असूनही त्यांनी ती देवगड विधानसभेची निवडणुक लढवली होती. १९९८ च्या राजापूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सुरेश प्रभू विजयी झाले.
सुरेश प्रभू यांनी त्यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते मच्छिंद्र कांबळी, पुष्पसेन सावंत यांचा पराभव केलेला. मालवणी नाट्य अभिनेते मच्छिंद्र कांबळी त्या निवडणुकीत मालवणीतून भाषण करायचे. मालवणी मुलखात त्यावेळच्या निवडणुकीत एक वेगळच वातावरण होतं. गंमत म्हणजे अभिनेते मच्छिंद्र कांबळी अनौपचारीक गप्पा मारताना म्हणायचे ‘माझ्या भाषणाक गर्दी खुप होता’. ‘भाषण ऐकान टाळये पडतत’ ‘पण माका माहिती आसा माका मता काय हे लोक देवक बसलेले नायत’. म्हणजे मच्छिंद्र कांबळी यांना पूर्ण माहिती होती.
आपला पराभव होणार याची कल्पना होती. समाजवादी विचार टिकला पाहिजे. याच हेतूने त्यावेळी जनतादलाचे माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनीही त्यावेळी लोकसभा निवडणुक लढवली होती. या लोकसभा निवडणुकीत दैनिक तरूण भारतचे तत्कालिन संपादक सीमाभागातील नेते किरण ठाकूर यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
सीमाभागातील ढोल पथक, झांजपथक राजापूर लोकसभा मतदार संघात गावो-गावी फिरताना दिसायचे. मुळ कुडाळ तालुक्यातील म्हापण गावचे असलेल्या किरण ठाकूर यांनाही जनतेने नाकारले होते. म्हणूनच त्यावेळच्या निवडणुकीत संगमेश्वर-देवरूख भागातील नलिनी बाबाजी भुवड यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणुक लढवली होती. रत्नागिरी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे अनंत गिते विजयी झाले होते. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्यावतीने अनंत गिते यांच्याविरोधात ज्येष्ठ पत्रकार दै.सागरचे संस्थापक, संपादक निशिकांत जोशी निवडणुक रिंगणात होते.
अपक्ष म्हणून सुजित भागोजी झिमण निवडणुक लढवत होते. रत्नागिरी लोकसभा मतदार संघातही पुन्हा एकदा शिवसेनेनीच बाजी मारली होती. १९९९ मध्येही राजापूर लोकसभा मतदार संघात शिवसनेचे सुरेश प्रभू तर रत्नागिरी लोकसभा मतदार संघात अनंत गिते निवडून आले होते.
१३ दिवसांचे अटलबिहारी वाजपेयी सरकार कोसळले होते, त्यामुळे ही निवडणुक झाली होती. राजापूर आणि रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत आणखीही अनेक गंमती-जमती आपणाला पहायच्याच आहेत.












