ना. नारायणराव राणे यांना आ. शेखर निकम व माजी आ. सदानंद चव्हाण, मनसेचे वैभव खेडेकर, आरपीआयचे दादा मर्चंडे यांची ग्वाही
तुमचा हक्काचा खासदार म्हणून मला निवडून द्या; आपल्या अपेक्षा तीन वर्षात पूर्ण करेन-ना. नारायणराव राणे
चिपळूणमध्ये महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे राणेंच्या हस्ते उद्घाटन
चिपळूण (संतोष सावर्डेकर):–देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मोफत धान्य, प्रत्येकाला उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना, यासारख्या योजना सुरू केल्या. तेही आजही १८-१८ तास काम करतात. विकसित भारत बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कष्ट घेत आहेत. म्हणून त्यांनी अभिमानाने सांगितलेल्या ‘अब की बार चारसौ पार’ मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जनतेने तुमचा हक्काचा खासदार म्हणून मला निवडून द्या. आपल्या अपेक्षा तीन वर्षात पूर्ण करेन, असा शब्द भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी मंगळवारी येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी चिपळूणवासीयांना दिला. तर तुमच्या शुभेच्छाने माझा विजय निश्चित मानतो, अशी भावना व्यक्त करताना शिवसेना उबाठा गटाचे उद्धव ठाकरे व खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली. तर आमदार शेखर निकम माजी आमदार सदानंद चव्हाण, मनसेचे वैभव खेडेकर, आरपीआयचे दादा मर्चंडे यांनी आम्ही एकजुटीने काम करून राणेंना मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.
भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना नारायणराव राणे यांच्या प्रचार कार्यालयाचे मंगळवारी चिपळूणमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात उद्घाटन झाले.
यावेळी ते पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून जो मला विश्वास दिलात. यामुळे आपला विजय निश्चित आहे, गेल्या ४० वर्षात अनेक पदे भूषवली. या पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. लोक म्हणतात, दादा तुम्ही इकडे येऊ नका, दादा तुम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी प्रथमच मत देण्याची आम्हाला संधी मिळाली आहे. तेव्हा तुम्ही चिंता करू नका, असा शब्द देत आहेत. या तुमच्या सर्वांच्या प्रेमाने भारावून गेलो आहे.
राजापूर येथील माजी आमदार गणपत कदम यांच्या आजच्या भेटीची माहिती देताना मागील आठवणींना उजाळा दिला. आपण माणूस जोपासली. मने राखली प्रत्येकाची गरज भागवली. नेतेपण मिरवले नाही तर प्रत्येकाला समजून घेत काम करीत राहिलो. यामुळे इथपर्यंत आपण पोहोचलो असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
तर ते पुढे म्हणाले की, माझी कामी पध्दत काहीशी वेगळी आहे. त्यामुळे कुठलाही प्रश्न मी शिल्लक ठेवत नाही. सिंधुदुर्गातील जनतेला याची कल्पना आहे. तेथे रोजगार, पर्यटनाला चालना दिली. अनेक प्रकल्प आणले, येणाऱ्या पुढील काळातही अनेक उद्योग सिंधुदुर्गात आणण्याच्यादृष्टीने नियोजन केले आहे. सिंधुदुर्गातील पाणी प्रश्न निकालात काढला आहे. पर्यायी सिंधुदुर्ग जिल्हा टँकर मुक्त केला आहे. तेथे झालेल्या विकासामुळे सिंधुदुर्गची ख्याती सर्वदूर पसरली आहे. प्रत्येक गावाला आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवल्या आहेत. अशा पध्दतीने काम पुढील काळात रत्नागिरी जिल्ह्यातही मला करायचे आहे. येथील अनेक प्रश्न रखडले आहेत. तेही मला पूर्ण करायचे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग आणायचे आहेत मात्र, जमिनी नाही म्हणू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग आणताना भरपूर त्रास झाला. मात्र उद्योग असो, चिपी विमानतळ असो, ते पूर्णत्वास नेले. यामुळे विकासासाठी तुमची सर्वांची साथ महत्त्वाची आहे, असे आवाहन भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांनी यावेळी केले.
एकीकडे पीएचडी झालेल्या माझ्या मुलाला पराभूत करून ज्या अकरावी नापास झालेल्या विनायक राऊतला तुम्ही निवडून दिलीत, त्याने काय विकास केला. कोकणात कुठे काही करायचे म्हटलं की, प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याशिवाय त्यानी कोणतेही काम केलेले नाही. सिंधुदूर्गतील विमानतळालाही विरोध केला. मात्र, आपण विकासाच्यादृष्टीने हे विमानतळही पुर्णत्वास नेले आणि विरोध करणारा हा खासदार त्या उद्घाटनाला मात्र सर्वांचे स्वागत करत होता, याचा संताप आला होता.
मराठी माणूस उद्योग -व्यवसायात कमी पडत आहे. मराठी माणसाने या क्षेत्रात पुढे आले पाहिजे. उद्योगातून पैसा मिळवायला हवा, असा सल्ला कोकणवासीयांना ना. नारायणराव राणे यांनी यावेळी दिला.
आमदार शेखर निकम यांनी जिल्हयाच्या विकासासाठी राणे यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे सांगीतले. ज्याप्रमाणे सिंधुदूर्गाचा विकास झाला. त्यापध्दतीने येथील विकासासाठी ते तळमळीने काम करतील. चिपळूणचा पुर आणि नदी संवर्धना प्रश्न हा महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे कोल्हापूर, सातारा, सांगलीला केंद्राकडून मोठा निधी मिळाला तसा निधी चिपळूणला मिळण्यासाठी राणे यांच्याकडून चिपळूणवासीयांच्या अपेक्षा आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार असल्याने आमची भूमिका महत्वाची आहे. आजला भाजपा, मनसे, शिवसेना ज्या पध्दतीने मतदारसंघात काम करत आहे ते पहाता मतदानापर्यत सर्वानी झटून काम करत राहीले तर मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य हे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातून मिळण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगीतले.
माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही आपल्या मार्गदर्शनात केंद्रीय मंत्री राणे आणि त्यांच्या माध्यमातून झालेला कोकणाचा विकास याचा उल्लेख करत या निवडणूकीत या मतदारसंघात महायुतीचे सर्व घटकपक्ष जोमाने काम करून मोठं मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगीतले.
मनसे सरचिटणीसटणीस वैभव खेडेकर यांनीही या मतदारसंघात मनसे कार्यकर्ते जीवाचे रान करून राणे यांना मताधिक्य देण्यात आघाडीवर असतील असे सांगितले. तर आरपीआयो नेते दादा मर्चंडे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशानुसार आरपीआय या मतदारसंघात अधिक जोमाने काम करत आहे, असे स्पष्ट केले.
यावेळी भाजपा माजी आमदार मधू चव्हाण, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालूकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रीतम रूके, शिवसेना तालूकाप्रमुख संदेश आयरे, शहर प्रमुख उमेश सकपाळ, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण, युवा सेना तालूकाप्रमुख निहार कोवळे, भाजपा सरचिटणीस रामदास राणे, माजी सभापती शशिकांत चाळके, मनसे जिल्हा सरचिटणीस संतोष नलावडे, शहराध्यक्ष अभिनव भूरण, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, दादा साळवी, मिलिंद कापडी, आदीती देशपांडे, माजी नगरसेवक आशिष खातू परिमल भोसले, माजी नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, वर्षा जागूष्टे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ. दिशा दाभोळकर, भाजपा युवा मोर्चा चिपळूण शहराध्यक्ष संदीप भिसे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल सावर्डेकर, अमित चिपळूणकर, जतीन घटे, निनाद आवटे, स्वानंद रानडे, प्रफुल्ल पिसे, शुभम पिसे, उदय ओतारी, सचिन पाटेकर आदी उपस्थित होते.










