अमित खोत | मालवण : मालवण बंदर जेटी येथे मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी वाळूशिल्प स्पर्धेचे आयोजन 24 एप्रिल ला करण्यात आले. स्पर्धेत टोपीवाला हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकवला.
स्पर्धेत कुडाळकर हायस्कूल, प्राथमिक व माध्यमिक शाळा, टोपीवाला हायस्कूल, भंडारी हायस्कूल, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, कन्याशाळा या शाळांनी सहभाग नोंदवला. मतदारांना मतदानाचा संदेश देणारी बोलकी वाळू शिल्पे विशेष आकर्षण ठरली. स्पर्धेचे परीक्षण मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, गट विकास अधिकारी आत्मज मोरे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले व मालवण नगर परिषदेचे लेखापाल दिनेश राऊत यांनी केले.
स्पर्धेत टोपीवाला हायस्कूलने प्रथम क्रमांक, कन्याशाळा द्वितीय क्रमांक तर जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कूलने तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. सर्व बक्षीस प्राप्त स्पर्धकांचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे, प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.











