वेरवली बुद्रुक येथे कारवाई, ३४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
लांजा (प्रतिनिधी) विनापरवाना गावठी हातभट्टीची तसेच-विदेशी मद्याची विक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी तालुक्यातील वेरवली बुद्रुक डोळसवाडी येथे धाड टाकून एका महिलेला ताब्यात घेतले आहे.त्याचप्रमाणे या ठिकाणी ३४४५ रुपयांचा गावठी तसेच विदेशी मद्याचा साठाही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता करण्यात आली असल्याची माहिती आज बुधवारी २४ एप्रिल रोजी पोलीसांनी पत्रकारांना दिली.
लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक डोळसवाडी या ठिकाणी एक महिला गावठी हातभट्टीची तसेच विदेशी मद्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने वेरवली बुद्रुक डोळसवाडी येथे मंगळवारी दुपारी ३.३० वाजता धाड टाकली. यावेळी त्या ठिकाणी तृप्ती जितेंद्र डोळस (वय ४२ राहणार वेरवली बुद्रुक डोळसवाडी) ही महिला गावठी हातभट्टीची दारू तसेच विदेशी मद्याच्या दारूसाठ्यासह आढळून आली.
पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत ५५० रुपयांची पाच लिटरची गावठी हातभट्टीची दारू, दहा रुपये किमतीचा एक मग, तर विदेशी दारू यामध्ये ३०० रुपये किमतीचे मॅकडॉल नंबर एक विदेशी दारूच्या १८० मिली मापाच्या दोन काचेच्या बाटल्या, ११४० रुपये किमतीच्या किंगफिशर स्ट्रॉंग बिअर च्या १८० मिली मापाच्या सहा काचेच्या बाटल्या, ९५० रुपये किमतीचे टुबर्ग स्ट्रॉंग बिअरच्या १८० मिलि मापाच्या पाच बाटल्या आणि ४९५ रुपये किमतीचे लंडन पिल्सनर स्ट्रॉंग बिअरच्या १८० मिली मापाच्या तीन काचेच्या बाटल्या अशा एकूण ३४४५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस बी.एस. रेवणे हे करत आहेत.










