विश्व हिंदू परिषदेच्यावतीने सावंतवाडीत “श्रीरामनवमी” उत्सवाचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गुरुवार ३० मार्च रोजी सावंतवाडीत “श्रीरामनवमी” उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री देव नारायण मंदिरात संपन्न होणार असून सकाळी १२ वा. रामजन्मोत्सव, सायंकाळी ४:०० ते ६:०० यावेळेत शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तर रात्री गीत रामायणाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अजित फाटक यांनी दिली.
दरम्यान, सकल हिंदू बांधवांना आणि संस्थांना एकत्र आणण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातू आम्ही प्रयत्न करीत आहोत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उत्सव यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. फाटक बोलत होते.

यावेळी संपर्कप्रमुख चिन्मय रानडे, इस्कॉनचे प्रकाश रेडकर, बजरंग संयोजक गौरव शंकरदास, कोषाध्यक्ष विनायक रांगणेकर, लक्ष्मीकांत कराड, किशोर चिटणीस आदी उपस्थित होते.सकाळी प्रथेप्रमाणे १२ वाजता रामजन्मोत्सव श्री देव नारायण मंदिर येथे नियोजित केला आहे. दुपारी ४ वाजता सावंतवाडी शहर व परिसरातील हिंदू बांधव व हिंदू संस्थांची शोभायात्रा आयोजित केली असून सदर शोभायात्रेचा मार्ग श्री देव नारायण मंदिर येथून निघून मुख्य रस्त्याने नगरपालिका -रामेश्वर प्लाझा -मिलाग्रीस चर्च कोपरा -जयप्रकाश चौक गांधी चौक – उभा बाजार – चितारआळी या मार्गाने परत नारायण मंदिर असा असेल. शोभायात्रेमध्ये ढोलपथक, वारकरी मंडळी शाळेतील मुलांचे लेझीम पथक, विविध हिंदू संस्थांची पथके, चित्र रथ तसेच रामायणातील विविध पात्रे सजीव स्वरुपात असे घटक समाविष्ट होणार आहेत. तर रामाची पालखी / रथ, मुलांचे कार्यक्रम अशा आकर्षक पद्धतीने शोभायात्रा निघणार आहे. मार्गावर विविध ठिकाणी भाविकांना दर्शन, पूजा, याचीही सोय केली आहे.श्री देव नारायण मंदिर परिसरात स्टेजवर शोभायात्रेचा समारोप झाल्यानंतर गीतारामायण व ‘भक्ती-प्राबल्य’ हे श्रीरामावर आधारित दशावतारी नाटक अशा भरगच्च कार्यक्रमांनी ही रामनवमी करण्याचा करण्याचा तमाम हिंदू समाजाचा मानस आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.