लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील आसगे दाभोळे मार्गावरील आसगे वझराच्या पऱ्या पुलाजवळ रविवार २८ एप्रिल रोजी झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यु झालेल्या जाधव बंधुंवर सोमवार २९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास गोविळ येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या अपघात प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
लांजा तालुक्यातील गोविळ जाधववाडी येथील रहिवासी असलेले प्रकाश साबाजी जाधव आणि शाम अर्जुन जाधव हे तळवडे येथे असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या होंडा शाईन मोटरसायकलने (क्र.एम.एच.०८-एएच-१९६० )गोविळ जाधववाडी येथून तळवडेकडे जात होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास लांजा-दाभोळे मार्गावरील आसगे येथील वझराच्या पऱ्यावरील पुलाजवळ एका वळणावर त्यांच्या मोटरसायकला अज्ञात वाहनाने समोरून धडक दिल्याने या धडकेत मोटरसायकल चालविणारे शाम अर्जुन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर प्रकाश साबाजी जाधव हे अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता.
श्याम जाधव आणि प्रकाश जाधव हे गोविळ जाधववाडी येथील सख्खे चुलत भाऊ. शाम जाधव यांच्या कुटुंबात वडील, पत्नी व दोन मुले असा त्यांचा लहान परिवार. श्याम जाधव हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होते. त्यांचा मोठा मुलगा पदवीधारक असून लहान मुलगा बारावी झाला आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवणारे शाम जाधव हे अचानकपणे काळाच्या पडद्याआड गेल्याने तरुण मुलांनी वडिलांचे छत्र गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच प्रकाश जाधव हे छत्रपती संभाजीनगर येथे एका खासगी कंपनी नोकरीला होते. लग्न समारंभ किंवा सणाउत्सवांमध्ये गोविळ येथे कुटुंबासमवेत त्यांचे येणे जाणे असे. प्रकाश जाधव यांना एक मुलगा आहे. तो शिक्षण घेत असून पत्नी, आई, वडील आणि भावंडे असा परिवार आहे.
दरम्यान, सोमवार २९ एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गोविळ येथे शोकाकुल वातावरणात श्याम जाधव आणि प्रकाश जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जाधव बंधूंच्या अकाली गोविळ येथील ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघात प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर भा.द.वि.कं. ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन अधिनियम कलम १८४, १३४, १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटूकडे हे करत आहेत.












