खासदार राऊत यांची अवस्था लबाड लांडगं ढोंग करतंय , विकास करायचं सॉंग करतंय
भाजपा लोकसभा संयोजक प्रमोद जठार यांची उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांचेवर टीका
लांजा (प्रतिनिधी) उद्धव ठाकरे हे मेमरी लॉस झालेल्या गजनी सिनेमाप्रमाणे आहेत तर विकास कामांना, जिल्ह्यात येणार्या उद्योग-प्रकल्पांना विरोध करायचा आणि दुसरीकडे विकास झाला नाही म्हणून बोंब ठोकणारे खासदार विनायक राऊत यांची ही भूमिका म्हणजे लबाड लांडगं ढाॅग करतंय , विकास करायचं सॉंग करतंय अशी असल्याची जळजळीत टीका भाजपा लोकसभा संयोजक, माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली.
लांजा येथे पत्रकारांशी बोलताना माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मेमरी लॉस होणार्या गजनी सिनेमाप्रमाणे आहेत. त्यांची दर पाच वर्षांनी मेमरी लॉस होते. कारण आज उध्दव ठाकरे हे पंतप्रधान मोदींवर टीका करतात, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावरच उद्धव ठाकरे यांनी २०१४ व २००१९ मध्ये १८ खासदार निवडून आणले होते. त्या वेळेचे व्हिडिओ आजही गावभर फिरत आहेत. मोदींसारखा माणूस नाही, मोदींसारखा पंतप्रधान नाही मोदींसारखे नेतृत्व नाही असे बोलत होते.
कोकणात येणार्या सी वर्ल्ड व चीपी विमानतळ सारख्या अनेक प्रकल्पांना विरोध करणारे खासदार विनायक राऊत चीपी विमानतळ उद्घाटनास हिरवा झेंडा दाखवायला सर्वात पुढे होते. त्यामुळे राऊत यांची अवस्था लबाड लांडगं ढोंग करतंय विकास करायचं सॉंग करतं अशी झाली असल्याचे प्रमोद जठार म्हणाले.
दहा वर्षात विनायक राऊत यांनी एक तरी मोठा प्रकल्प आणला का? आणि दहा-बारा लोकांना तरी कामाला लावले का नाही, तर आम्ही आमचे विकासाचे प्रकल्प सांगतो असे प्रति आव्हान जठार यांनी विनायक राऊत यांना दिले.उद्धव ठाकरेंपासून थेट खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत एकच माझा सवाल आहे की विनायक राऊत या खासदाराने दहा वर्षात एकही काम केलं नाही म्हणून जनतेने ठरवलं विनायक राऊत यांची भाकरी परतायची आहे .विकास झाला नाही अशी कोल्हेकुई कालच्या सभेत झाली मात्र जनता सुजाण आहे विनायक राऊत यां खासदाराने आलेले सर्व प्रकल्प पळवून लावले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये विनायक राऊत यांनी बेरोजगारी वाढवली, रस्त्याची कामे होऊन दिली पर्यटनाचे प्रकल्प होऊ दिले नाहीत पण आम्ही हा सगळा बॅकलॉग नारायण राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे.












