महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांचा एकतर्फी विजय होईल

 

भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर : खा. राऊत यांचा पराभव निश्चित असल्याचे केले स्पष्ट

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हयात भाजप शिवसेना महायुतीसाठी चांगल्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातून यापूर्वी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून ना. नारायण राणेच विजयी होतील. असा ठाम विश्वास भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, खासदार विनायक राउत हे महायुतीतून निलंबित केलेले अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे विनायक राउत या लोकसभा निवडणूकीत पराभूत होणार असून ही निवडणूक राणे साहेबांना एकतर्फी असेल. असेही बाबा मोंडकर यांनी सांगितले.

भाजप कार्यालय येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सुर्यकांत फणसेकर, आबा हडकर, मंदार लुडबे, पूजा सरकारे आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाबा मोंडकर म्हणाले, या लोकसभा निवडणूकीत भाजपने ४०० पारचा नारा देउन भारत देशाला दिशा देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकसित होत आहे. सर्वसामन्य जनता, शेतकरी, मच्छिमार, कष्टकरी या सर्वांचा विचार करत देश विकासाचे व्हिजन घेऊन पंतप्रधान वाटचाल करत आहेत. दुसरीकडे उबाठा सेनेकडून या लोकसभा निवडणूकीत दोन डझन देखील खासदार उभे नाहीत. आणि जाहीरनाम्याची धुळफेक सूरू आहे.

ना. नारायण राणेंच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्हयातील मच्छिमार, कृषी, पर्यटन या क्षेत्रांना भरीव निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणूकीत नारायण राणे हे अडीज लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील. अपक्ष उमेदवार विनायक राउत यांच्याकडून जिल्हयाचा विकासासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हयातील जनेतेने या लोकसभा निवडणूकीत त्यांचा पराभव निश्चित करत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला आहे. असे मोंडकर यांनी सांगितले.