कोकणाचा खंबाटा होवु द्यायचा नसेल तर खासदार बदला, कोकणाचे नशीब बदले- प्रमोद जठार

कुडाळ प्रतिनिधी

कोकणाच्या मुळ प्रश्नांची जाणीवच नसलेल्या ठाकरेसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व खासदार विनायक राऊत यांच्या आडमुठ्या धोरणामुळे कोकणात येणारे प्रकल्प बंद पडले, कोकणचा विकास रखडला, रोजगाराच्या संधी गेल्या असे आरोप भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे व राऊत यांचेवर लगावत कोकणाचा खंबाटा होवु द्यायचा नसेल तर खासदार बदला, कोकणाचे नशीब बदलेल असा टोला खा. राऊत यांना लगावला.

कुडाळ येथे प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य बंड्या सावंत व मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते.
यावेळी जठार यांनी जोरदार टिका ठाकरे व राऊत यांचेवर करताना त्यांनी सांगितले की,  कोकणात येणारे व रोजगार निर्मिती करणारे प्रकल्प, सीवर्ल्ड सारख्या अनेक प्रकल्पानां उद्धव ठाकरे व खा. राऊत यांनी विरोध केला, व प्रकल्प बंद करून कोकणाचा विकास रखडवला.

मुंबईतील खंबाटा कंपनीत संप झाला, तेव्हा खा.  राऊत यांनी  त्या कंपनीचे मालक व युनियनच्या माध्यमातून संगनमत करून ही कंपनी बंद करून खंबाटातील २ हजार मराठी लोकांना घरी बसविण्याचे काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी राऊत यांचेवर करीत भविष्यात कोकणाचा खंबाटा होवु द्यायचा नसेल तर खासदार बदला, कोकणाचे नशीब बदलेल असा टोला खा. राऊत यांना लगावला.

ठाकरे व राऊत यांच्यात नकारत्मकता भरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर दोनवेळा खा. राऊत निवडुन आले होते, पण विकास काहीच केला नाही. नुसतीच घाई घाई, करीत तर काहीच नाही अशी अवस्था त्यांची आहे असा ही टोला त्यांनी राऊत यांना लगावला.
ज्या गोष्टी करू नये असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते, त्याच गोष्टी उध्दव ठाकरे करतात, त्यामुळे आता स्वताचे साम्राज्य व घर संपविण्याचे काम स्वतः  ठाकरे व संजय राऊत हेच करतील असा ही टोला जठार यांनी लगावला.

म्हणून महायुती परिपूर्ण झाली- प्रमोद जठार
या कोकणातील सहा लोकसभा मतदार संघात महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना उमेदवारी दिली गेली, त्यामुळे भाजपला ही एका मतदार संघातुन उमेदवारी मिळावी ही आमची इच्छा होती,  व भाजपाला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातुन उमेदवारी दिल्याने येथील महायुती परिपूर्ण झाली असे ही माजी आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे साडेतीन लाख मताधिक्याने विजय होतील
भाजपा उमेदवार नारायण राणे हे साडेतीन लाख मताधिक्य घेवुन निवडुन येतील त्यामुळे जिंकणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा आणि कोकणाच्या भविष्यातल्या विकासाचे साक्षीदार व्हा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.