मळेवाड ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट बेपत्ता

 

सावंतवाडी । प्रतिनिधी :

मळेवाड शिरसाटवाडी येथील रहिवासी तथा मळेवाड ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य महेश रंगनाथ शिरसाट हे गेले दोन दिवसापासून बेपत्ता आहेत. त्यांचा मळेवाडपासून ते आंबोली कानूर, चंदगडसह सर्वत्र शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. याबाबत पोलीस ठाण्यात त्यांच्या पत्नीने तक्रार दिल्यावरून नापत्ता अशी नोंद करण्यात आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मळेवाड ग्रा. पं. सदस्य महेश शीरसाट हे बुधवारी दुपारी जेवण करून घरून निघाले. आपण कामासाठी जातं असल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले. त्यानंतर त्यांनी फोन करुंन आपण आंबोली येथे मावशीकडें जात आहे अशी कल्पना दिली. दुसऱ्या दिवशी तिथे फोन करून विचारणा केली असता घरी येतो असे सांगितले. पुन्हा पत्नीने त्यांच्या मोबाईल वर गुरुवारी सायंकाळी फोन केला असता मळगाव येथे आहे पंधरा मिनिटात घरी येतो असे आश्वासन दिले.

त्यानंतर रात्री १० वाजले तरी उशिरा पर्यत ते घरी दाखल झाले नाहीत शिवाय त्यांच्या मोबाईल वर कॉल केला असता तोही बंद आला. यानंतर शिरसाट यांची आजूबाजूच्या गावात चौकशी केली असता ते कोठेही नसल्याचे सांगण्यात आले. नातेवाईक शेजारी मित्र या सगळीकडे फोनवरून चौकशी केली मात्र तरी त्यांचा पत्ता लागला नाही. सावंतवाडी आंबोली कानूर, चंदगड याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन खात्री केली परंतु ते तिथे आढळले नाहीत.

त्यामुळे पत्नी श्रद्धा शिरसाट यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी याबाबत नापत्ता अशी नोंद केली आहे. बेपत्ता महेश शीरसाट हे मळेवाड ग्रामपंचायतचें विद्यमान सदस्य आहेत. ते मळेवाड येथे वोशिंग सेंटर चालवतात. त्यांनी सोबत ॲक्टिव्हा दुचाकी नेली आहे त्यांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी दिली.