कशेडी बोगदा ते परशुराम घाट दुभाजकाच्या कामात भ्रष्टाचार

 

रुपेश पवार यांचा आरोप: चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कशेडी बोगदा ते परशुराम घाट या टप्प्यात महामार्गाच्या दुभाजकावर झाडे लावण्याचा कामात मोठा गैरव्यवहार झाला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करावी; अन्यथा उपोषण करून लक्षवेधण्याचा इशारा रुपेश पवार यांनी पोलीस व प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

पवार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम उपविभाग रोहा – रायगड यांच्याकडून माहितीच्याअधिकाराखाली माहिती मागवली होती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध दुभाजकावर ४.५० मीटर एवढ्या अंतरामध्ये फुलझाडे, वेलवर्गीय झाडे, कार्बन शोषण करणारी झुडपे लावण्यात येत असल्याचे त्यांनी कळवले आहे. त्यासाठी त्यांनी मे. कशेडी परशुराम हायवे प्रा. लि. या ठेकेदाराशी करारनामा केल्याचे देखील कळवले
आहे. या करारनाम्याची प्रत त्यांनी दिली नाही. या कामासाठी ५७९.५० कोटी रुपये खर्चाची तरतूद आल्याचे त्यांनी कळवले असले तरी अद्याप
कशेडी बोगदा ते परशुराम घाट यादरम्यान १० टक्के भागात देखील दुभाजकावर फुलझाडे लावण्यात आल्याचे निदर्शनास येत नाही. तसेच महामार्गाच्या मधोमध ४.५० मीटर एवढे अंतर समाविष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, एवढे अंतर न सोडता अनेक ठिकाणी दुभाजक बनवण्यात आला आहे. महामार्गाच्या मधोमध माती ऐवजी बुरुम, दगड, गोटे आणि इमारत अथवा अन्य रस्त्याचा मलबा तसेच गरड टाकण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. जी झाडे लावण्यात आले आहे, असे सांगण्यात येते त्या ठिकाणी झाडेच नसून भटक्या गुरांनी झाडे खाल्ली असे हास्यास्पद उत्तर संबंधित ठेकेदार देत आहे.

विभागाचे अधिकारीदेखील उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहेत. महामार्गाच्या मधोमध झाडे लावली नसल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. कोट्यवधी रुपयांची तरतूद असूनदेखील आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी चौकशीचे आदेश खेड आणि चिपळूण प्रांत तसेच महामार्ग बांधकाम विभाग चिपळूण यांना दिले आहेत. मात्र, अद्यापही यासंदर्भात चौकशी आणि कारवाई झाली नाही. कारवाईला दिरंगाई होत असल्यामुळे आपण आचारसंहिता संपल्यानंतर खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन रुपेश पवार यांनी पोलिस व प्रशासनाला राष्ट्रीय महामार्ग बांधकाम यांना दिले आहे.